

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क
दिवाळसण आणि सुट्ट्यांची पर्वणी साधत अनेक पर्यटकांनी नाशिकला हजेरी लावली आहे. मात्र, ऐन सणासुदीच्या काळात खंडग्रास ग्रहण आल्याने पंचवटी आदी परिसरातील मंदिरे ग्रहणकाळात बंद असल्याने पर्यटकांना एक दिवस उशीराने देवदर्शनासाठी वाट बघावी लागणार आहे.
कोराेनामध्ये दोन वर्षे मंदिरे कुलुपबंद होती. त्यानंतर आता दिपोत्सवात मंदिरे ग्रहण लागल्याने पुन्हा बंद करण्यात आली आहेत. पंचवटी परिसरात अनेक मंदिरे असल्याने भाविक दिवाळीच्या सणासुदीच्या कालावधीत चार ते पाच दिवस सुट्टी काढून पर्यटनासाठी व देवदर्शन तसेच विविध धार्मिक विधी पार पाडण्यासाठी हजेरी लावत आहेत. तसेच नोकरदारवर्गही ज्या काही सुट्टया हाती असतील त्यानुसार सुट्ट्यांचे नियोजन करत कुटुंबियांसोबत नाशिकला हजर झाले आहेत. त्यात काही भाविकांना ग्रहण कालावधीचा वेळ माहिती नसल्याने मंदिर परिसरात हजेरी लावली असता मंदिरे कुलूपबंद आढळून आल्याने दूरवरुन आलेल्या भाविक नाराज झाले आहेत. काही मंदिर प्रशासनाने मंदिराच्या बाहेरील मुख्य दरवाजावर मंदिर बंद असल्याचे फलक लावले आहे. त्यामुळे भाविकांना बंद दरवाजा बाहेरूनच दर्शन घेऊन समाधान मानावे लागत आहे. तर काही भाविकांना एक दिवस उशीराने देवदर्शनासाठी वाट बघावी लागणार आहे. सायंकाळी 6 वाजून 9 मिनिटांनी ग्रहण सुटल्यानंतर मंदिरात पुन्हा मूर्तीपूजा केल्यानंतरच भाविकांना दर्शनासाठी मंदिरे खुले करून दिली जाणार आहे. आधुकनिकतेकडे पाऊले वळताना अजूनही ग्रहण कालावधीत पाळले जाणारे पारंपरिक नियमांची वाट चालणारे अनेक भाविक मंदिर प्रशासनाने दिलेला हा नियम पाळतांना दिसले.