नाशिक : आनंदाचा शिधा अन् वितरणात बाधा | पुढारी

नाशिक : आनंदाचा शिधा अन् वितरणात बाधा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
राज्य शासनाने आनंदाचा शिधा ऑफलाइन वितरणास परवानगी दिल्यानंतरही जिल्ह्यात घोळ कायम आहे. ऐन लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लाभार्थ्यांनी किटसाठी रेशन दुकानांमध्ये गर्दी केली होती. त्यामुळे एकच गोंधळ निर्माण होत आहे. दरम्यान, पाच तालुक्यांत पूर्ण क्षमतेने किट पोहोचले आहेत. लाभार्थ्यांपर्यंत ते पोहोचले की नाही, याची खातरजमा करण्यासाठी प्रशासनाकडून दुकानांची अचानक तपासणी केली जाणार आहे.

दीपावलीसाठी शासनाने प्रत्येकी एक किलो रवा, साखर, पामतेल व चणाडाळीचे किट 100 रुपयांमध्ये उपलब्ध करून दिले आहे. गोरगरिबांसाठी असलेले हे आनंदाचा शिधा किट जिल्ह्यात वाटपाच्या पहिल्या दिवसापासून समस्यांच्या गर्तेत सापडले आहे. पहिले तीन दिवस ई-पॉस सर्व्हरमुळे किट वितरणात अडथळे निर्माण होत असल्याने शासनाने ऑफलाइन पद्धतीने किट वितरणास परवानगी दिली. मात्र, तरीही रेशन दुकानदारांसमोरील अडचणी संपलेल्या नाहीत. ऑफलाइन पद्धतीने किट देताना नोंदवहीत लाभार्थ्यांची संपूर्ण माहिती भरून घेण्यास विलंब लागत असल्याने नागरिकांमध्ये रोष आहे. आनंदाचा शिधा किटवरून रेशन दुकानदारांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत असताना, पुरवठा विभाग मात्र त्र्यंबकेश्वर, सिन्नर, चांदवड, दिंडोरी व नांदगाव या तालुक्यांमध्ये पूर्ण क्षमतेने किट पोहोचल्याचे सांगत आहे. उर्वरित तालुक्यांनाही मागणीनुसार किट उपलब्ध करून दिले जात आहे. दरम्यान, ऑफलाइन वितरणात लाभार्थ्यांपर्यंत किट पोहोचले की नाही, याची पडताळणी पुरवठा विभाग करणार आहे. त्यासाठी दुकानांना अचानक भेटी देतानाच ऑफलाइन नोंदवहीतील लाभार्थ्यांशी संपर्क साधत त्यांना किट मिळाल्याची माहिती जाणून घेण्यात येणार आहे. त्यामुळे दुकानदारांचे धाबे दणाणले आहेत.

दुकानांवर बंदचे फलक…
शहरातील सिडको, सातपूर भागातील काही रेशन दुकानदारांनी सोमवारी (दि. 24) दुकाने बंद ठेवली तसेच भाऊबीजेपर्यंत दुकाने बंद राहणार असल्याने त्यानंतर किट घेण्यास यावे, असे फलक बंद दारावर लावले आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांचा हिरमोड झाला आहे. ऐन दिवाळीत शिधा मिळणार नसल्याने अनेक कुटुंबांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. दरम्यान, अशा पद्धतीने दुकाने बंद ठेवणे योग्य नसून, जनतेला किट वितरणासंदर्भातील योग्य त्या सूचना दुकानदारांना देण्यात येतील, असे जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसीकर यांनी सांगितले.

हेही वाचा:

Back to top button