Dipotsav 2022 : नाशिककरांकडून गाय-वासराचे मनोभावे पूजन | पुढारी

Dipotsav 2022 : नाशिककरांकडून गाय-वासराचे मनोभावे पूजन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

तिमिराकडून तेजाकडे घेऊन जाणाऱ्या दिवाळी प्रकाशपर्वाच्या सणाला शुक्रवारी (दि.२१) वसुबारसने प्रारंभ झाला. नाशिककरांनी गाय-वासराचे मनोभाव पुजन करून गो-मातेप्रती कृतज्ञता व्यक्त केली. दिवाळीनिमित्ताने सर्वत्र चैतन्य आणि आनंद पसरला आहे. शनिवारी (दि.२२) सर्वत्र धनोत्रयोदशी साजरी करण्यात येणार आहे.

दोन वर्षाच्या खंडानंतर कोरोना निर्बंधमुक्त दिवाळी साजरी करता येत असल्याने नाशिककरांमध्ये यंदा उत्साह अधिक आहे. दिवाळी पर्वाला वसुबारसने शुभारंभ झाला आहे. पंचवटीमधील पांजरापोेळ, गंगापूर रोडवरील बालाजी मंदिर येथील मोराेपंत पिंगळे गोशाळा, तपोवनातील कृषी गो-सेवा व मंगलरूपसह अन्य गो-शाळांमध्ये गो-मातेच्या दर्शनासाठी लगबग पाहायला मिळाली. नागरिकांनी सहकुटूंब यावेळी गाय-वासरांचे मनोभावे पुजन केले. तसेच भाकरी, गवारीची भाजी, पुरणपोळी व गोडधोडाचा नवैद्य गो- मातेला अर्पण करण्यात आला. ग्रामीण भागात बळीराजाने कुटूंबियांसमवेत गायीचे पुजन करून तीच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली. तसेच कुटुंबाच्या भरभारीटीसाठी गो-मातेचे आर्शिवाद घेतले.

दिवाळीतील दुसरा दिवस अर्थातच धनत्रोयदशीची शनिवारी (दि.२२) साजरी करण्यात येणार आहे. आरोग्याची दैवता असलेल्या धन्वंतरी पुजनाचे विशेष वैद्यकीय क्षेत्रात विशेष महत्व आहे. धनत्राेयदशी साजरी करण्यासाठी सर्वत्र जय्यत तयारी करण्यात आली आहे. दरम्यान, सोमवारी (दि.२४) नरक चतुदर्शी आणि बुधवारी (दि.२६) बलिप्रतिपदा अर्थात पाडवा तसेच भाऊबीज एकत्रित साजरा करण्यात येणार आहे. तब्बल २७ वर्षांनी हे दोन्ही दिवस एकत्रित आल्याने या दिनाला विशेष महत्व आहे.

हेही वाचा :

Back to top button