बेकायदा नोंदीच्या दबावाने हवेलीत तलाठी त्रस्त संघटना आक्रमक आंदोलनाच्या पवित्र्यात | पुढारी

बेकायदा नोंदीच्या दबावाने हवेलीत तलाठी त्रस्त संघटना आक्रमक आंदोलनाच्या पवित्र्यात

सीताराम लांडगे : 
लोणी काळभोर : महसूलच्या बेकायदा नोंदीची कामे करून घेण्यासाठी गावकामगार तलाठ्यांवर हवेली तालुक्यात दबावतंत्र वाढत असल्याने तलाठी त्रस्त झाले असून, सध्या तलाठी संघटना आक्रमक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. पुणे शहराच्या बाजूला हवेली तालुका विस्तारला असल्याने जमिनीच्या व्यवहाराची उलाढाल मोठ्या प्रमाणात आहे. निर्वेध जमिनीबरोबर वादातील जमिनींचे व्यवहार मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. जमिनीची सर्व छोटी-मोठी कामे गावकामगार तलाठ्यांकडे असतात. हवेली तालुक्यात सध्या जमिनींच्या बेकायदा नोंदी नोंदवून घेण्यासाठी तलाठ्यांकडे रांगा लागल्या आहेत. सात-बारा, फेरफार ही कामे गावपातळीवर असल्याने त्यावरील नोंदी धरण्यासाठी तलाठ्यावर वेगवेगळ्या प्रकारे दबावतंत्र वापरला जात आहे.

राजकीय पदाधिकारी अथवा लोकप्रतिनिधींचा दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. माहिती अधिकाराचे हत्यार उपसून त्रास देण्याचे काम होत आहे. वरिष्ठांकडे खोट्या तक्रारी दाखल करण्याची धमकी दिली जाते. एवढे करूनही बेकायदा काम होत नाही म्हणून माध्यमांकडे जाण्याची धमकी दिली जाते. या सर्व त्रासाला  हवेली तालुक्यातील तलाठी कंटाळले आहेत.

 

हवेली तालुका मोठा असल्याने कामाचा व्याप मोठ्या प्रमाणात आहे. सर्व तलाठी चांगल्या प्रकारे कायदेशीर कामे करतात. त्यांच्यावर जर बेकायदा कामासाठी दबाव येत असेल तर उपविभागीय अधिकारी म्हणून त्यांच्या पाठीशी उभे राहणे हे माझे कर्तव्य आहे. त्यांच्या अडचणी मी प्राधान्याने समजून घेणार आहे.
– संजय असवले, प्रांतधिकारी, हवेली

हवेली तालुक्यात बेकायदा नोंदी न करण्याबाबत आम्ही सर्व तलाठ्यांना सूचना दिल्या आहेत. त्याचे तंतोतंत ते पालन करतात. तालुक्यात गावकामगार तलाठ्यांवर दबावतंत्र वापरला जात असल्याच्या अनेक तक्रारी येत आहेत. तलाठ्यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता आपले कर्तव्य चोख बजावावे. तालुक्यातील महसूल विभागाचे प्रमुख म्हणून मी सर्व तलाठ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. त्यांना सर्व ती कायदेशीर मदत केली जाईल
– तृप्ती कोलते पाटील, तहसीलदार, हवेली

या टोळ्यांचा दबाव झुगारणार
या दबाव टाकणार्‍या टोळ्यांना न घाबरता कायदेशीर मार्गाने यांचा सामना करावा व यांची बेकायदा कामे करण्यासाठी दबावाला न झुगारता हवेली तालुक्यातील सर्व तलाठीवर्ग आता वेळप्रसंगी आंदोलनाचे हत्यार उपसणार असल्याचा इशारा गावकामगार तलाठी संघटनेने जाहीर केला आहे.

Back to top button