सांगली : दिवाळी खरेदीसाठी उत्साह, गर्दी | पुढारी

सांगली : दिवाळी खरेदीसाठी उत्साह, गर्दी

सांगली; पुढारी वृत्तसेवा : दिवाळीसाठी आता काही तासच अवधी राहिला असल्याने बाजारपेठेत एकच गर्दी पाहण्यास मिळत आहे. शेवटच्या टप्प्यात विविध वस्तूंची खरेदी केली जात असून दुकानदारांच्यात धांदल उडाली आहे. कोरोना संसर्गामुळे दोन वर्षे बाजारपेठेवर सावट होते. त्याचा फटका सर्वांनाच बसला त्यानंतर आता काही महिन्यापासून स्थिती पूर्व पदावर आली आहे. त्यामुळे बाजारपेठेत गर्दी आहे.

दिवाळी सणाच्या खरेदीसाठी विशेषत: गणपतीपेठ, कापडपेठ, हरभट रस्ता, दत्त- मारुती रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी दिसत आहे. नोकरदारांना नोव्हेंबरचा पगार आणि बोनस लवकर मिळाल्याने बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण आहे. खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. दिवाळीत तयार फराळास खूप महत्व असते. खाद्य पदार्थांच्या किमतीत वाढ झाल्याने फराळांच्या किमतीतही वाढ झाली आहे. तरीसुद्धा ग्राहकांची तयार फराळासाठीची मागणी बाजारात मोठ्या प्रमाणात आहे.

आकाश कंदिलाची खरेदी झाल्यानंतर दिवाळीच्या खरेदीला पूर्णत्व आल्यासारखे वाटते. विविध रंगांचे, आकारातील आकाश कंदिलांची खरेदी करण्यासाठी नागरिक सहकुटुंब आकाश कंदिलांच्या स्टॉलला भेट देत आहेत. फुलांचे, कापडी, विविध रंगातील चांदण्या, आकर्षक रंगसंगतीच्या झिरमिळ्या लावलेले आकाशकंदील लक्ष वेधून घेत आहेत. कापडी आणि लाकडी आकाशकंदील सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत. कापडाच्या आकाश कंदिलात दोन ते पाच फुटांपर्यंतचे पर्याय ग्राहकांना मिळतात. साधारणत: 200 रुपयांपासून ते दोन हजार रुपयांपर्यंत आकाशकंदील उपलब्ध आहेत.

दिवाळीत अंगणात दररोज रांगोळी काढली जाते. त्यामुळे रांगोळी काढण्यासाठी दिवाळीसाठी म्हणून आलेल्या वस्तूंनी दुकाने भरून गेली आहेत. दुकानांबरोबरच फूटपाथवरही अनेक विक्रेत्यांनी रांगोळी, रंग, रांगोळीची पुस्तके, रांगोळीचे छाप, सुगंधी उटणे विक्रीसाठी आणल्या आहेत. या वस्तू खरेदीसाठी गर्दी होत आहे. दिवाळीत प्रामुख्याने खरेदी होते ती कपड्यांची. त्यामुळे या काळात कपडे विक्रेत्यांचा सर्वाधिक व्यवसाय होतो. पगार, बोनस हातात आल्याने दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी आहे. विशेषत: लहान मुलांच्या कपडे खरेदीसाठी गर्दी होत आहे. दिवाळीनिमित्त बाजारात खर्‍याखुर्‍या वाटणार्‍या आर्टिफिशियल मेणबत्त्या दाखल झाल्या आहेत. बॅटरीवर चालणार्‍या या मेणबत्या सजावटीसाठी वापरल्या जातात. यात विविध रंगही उपलब्ध आहेत. अगदी 50 रुपयांपासून या मेणबत्या उपलब्ध आहेत.

Back to top button