माता सुरक्षित योजना : चार लाख जणींनी घेतला लाभ; आरोग्य मोहिमेला उदंड प्रतिसाद | पुढारी

माता सुरक्षित योजना : चार लाख जणींनी घेतला लाभ; आरोग्य मोहिमेला उदंड प्रतिसाद

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
माता सुरक्षित, तर घर सुरक्षित या मोहिमेंतर्गत आजपर्यंत चार लाख 601 इतक्या 18 वर्षांवरील मुली आणि महिला यांची तपासणी पूर्ण झाली आहे. 26 ऑक्टोबरपर्यंत चालणार्‍या या मोहिमेला ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. त्यामध्ये ग्रामीण भागात सर्वाधिक 2 लाख 71 हजार 711 महिलांनी लाभ घेतला आहे. उर्वरित महिलांनी या मोहिमेत सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषद आरोग्य प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

नवरात्रोत्सवात आरोग्य विभागाने 18 वर्षांवरील मुली व महिलांच्या आरोग्याला प्राधान्य देण्याचा निर्णय घेऊन प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणीदेखील सुरू केली आहे. 26 सप्टेंबर रोजी सुरू झालेली मोहीम ग्रामीण भागातील महिलांचा सहभाग बघता, 26 ऑक्टोबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. या अंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक आरोग्य केंद्रात महिलांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात येऊन त्यांच्यावर गरज पडल्यास औषधोपचारही केले जात आहेत. आरोग्य विभागाने नवरात्रोत्सवात महिलांच्या आरोग्यासाठी ही मोहीम हाती घेतली असून, त्याची अंमलबजावणी पहिल्या माळेपासून करण्यात आली. फक्त तरुणी व महिलांच्याच आरोग्याची तपासणी करण्याचा हा पहिलाच प्रयत्न राबविला जात असून, त्यासाठी संपूर्ण आरोग्य यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. गावपातळीवरील आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा रुग्णालय अशा विविध पातळ्यांवर या तपासण्या केल्या जात आहेत. येत्या 26 ऑक्टोबरपर्यंत असलेल्या या महिमेमध्ये जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 11 लाख तरुणी व महिलांची तपासणी करण्याचे उद्दिष्ट आरोग्य विभागाने ठेवले आहे. यामध्ये प्रामुख्याने महिलांच्या रक्त, लघवी, हिमोग्लोबिन याबरोबरच मासिक पाळीची अनियमितता, गर्भारपणातील त्रास, रक्तदाब, गर्भाशयातील कर्करोग आदी तपासणी केली जाणार आहे. यामध्ये आणखी काही आढळून आल्यास त्याबाबत योग्य तो औषधोपचार तसेच पाठपुरावादेखील आरोग्य विभाग करणार आहे.

या मोहिमेसाठी जिल्ह्यातील 15 तालुक्यांत एक लाखापेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या तालुक्याच्या मुख्यालयी अशा 28 ग्रामीण रुग्णालयांमध्ये मोफत तपासणी शिबिराची व्यवस्था आहे. जिल्ह्यात 112 प्राथमिक आरोग्य केंद्रे असून, दाखल रुग्णांवर उपचाराची सोय या आरोग्य केंद्रात करण्यात आली आहे. तज्ज्ञ डॉक्टरांची पथके व कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया, महिलांच्या बाळंतपणाची व्यवस्था याठिकाणी सज्ज आहे. जिल्ह्यात सुमारे 592 उपकेंद्रे ही दोन किंवा तीन गावे मिळून एक उपकेंद्र अशा प्रकारात आहे. त्यामुळे लगतच्या गावांमधील महिला, तरुणींची तपासणी याठिकाणी केली जाते. या मोहिमेत जिल्हा शासकीय रुग्णालय, चांदवड, त्र्यंबकेश्वर, मनमाड, कळवण आणि येवला या चार उपजिल्हा रुग्णालये यांचा समावेश आहे. मालेगाव येथील जिल्हा रुग्णालय व स्त्री रुग्णालय येथेदेखील ही मोहीम राबविली जात आहे. गावपातळीवर आरोग्यवर्धिनी उपकेंद्र येथील समुदाय आरोग्य अधिकारी व आरोग्यसेविका यांच्यामार्फत महिला व भगिनी यांची तपासणी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

रुग्णालये संख्या अशी…

ग्रामीण रुग्णालये – 2,71,711
जिल्हा व उपजिल्हा रुग्णालये – 21,114
नाशिक महापालिका – 31,003
मालेगाव महापालिका – 76,773

तपासण्या याप्रमाणे
4 लाख 601 : 18 वर्षांवरील महिला व भगिनी यांची तपासणी
62 हजार 838 : वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत गरोदर मातांची तपासणी
42 हजार 138 : गर्भधारणपूर्व सेवा कार्यक्रमांतर्गत तपासणी
2 लाख 24 हजार 417 : 30 वर्षांवरील महिलांची असंसर्गजन्य आजार तपासणी
7 हजार 145 : मोतीबिंदूसाठी तपासणी :
52 हजार 832 : मानसिक आरोग्य तसेच व्यसनमुक्तीसाठी समुपदेशन
34 हजार 585 : राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम

हेही वाचा:

Back to top button