नाशिक : चिमुकल्यांवर अत्याचार करणाऱ्यांना सक्तमजूरी | पुढारी

नाशिक : चिमुकल्यांवर अत्याचार करणाऱ्यांना सक्तमजूरी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

वेगवेगळ्या घटनांमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग चार वर्षीय मुलावर अनैसर्गिक अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्यांना न्यायालयाने सक्तमजूरी व दंड ठोठावला आहे. रवींद्र आबाजी जगताप (५६, रा. उत्तम नगर, सिडको) आणि मनोज उर्फ साई शिवदास श्रीवंत (४५, रा. सुभाषरोड, नाशिकरोड) अशी आरोपींची नावे आहेत.

पहिल्या घटनेत २७ ऑक्टोबर २०२१ रोजी सायंकाळी सिडकोतील उत्तमनगर येथे रवींद्र जगताप याने दहा वर्षीय मुलीचा विनयभंग केला होता. याप्रकरणी पीडितेच्या आईने अंबड पोलिस ठाण्यात रवींद्र विरोधात विनयभंगासह पोक्सोची फिर्याद दाखल केली होती. अंबडचे पोलिस उपनिरीक्षक एच. एस. पावरा यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षातर्फे ॲड. एस. एस. गोरे यांनी युक्तीवाद केला. रवींद्रविरोधात गुन्हा शाबित झाल्याने अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एस. खरात यांनी रवींद्रला परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे तीन वर्षे सश्रम कारावास व एक हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून पोलिस अंमलदार सी. एम. सुळे, आर. आर. जाधव यांनी कामकाज पाहिले.

तर दुसऱ्या प्रकरणात मनोज श्रीवंत याने ११ नोव्हेंबर २०१८ रोजी चिमुकल्यावर अत्याचाराचा प्रयत्न केला. पीडित मुलाच्या पालकांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी मनोज याने घरात एकटा असलेल्या मुलावर अनैसर्गिक अत्याचाराचा प्रयत्न केला. त्याच्याविरोधात नाशिकरोड पोलिस ठाण्यात अत्याचारासह पोक्सोचा गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षातर्फे ॲड. दिपशिखा भीडे यांनी युक्तीवाद केला. त्यांनी नऊ साक्षीदार तपासले. त्यानुसार अतिरीक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. डी. देशमुख यांनी आरोपी मनोज यास पोक्सो कायद्यानुसार तीन वर्षे सश्रम कारावास व आठ हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावली आहे.

हेही वाचा :

Back to top button