नाशिक : सोशल मिडियाच्या माध्यमातून तारुखेडले येथील मंदिराचा कायापालट | पुढारी

नाशिक : सोशल मिडियाच्या माध्यमातून तारुखेडले येथील मंदिराचा कायापालट

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
सोशल मीडियाच्या माध्यमातून केलेल्या आवाहनाला दानशूरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने भरघोस रक्कम देणगी स्वरूपात जमा झाली. त्यामुळे श्रीक्षेत्र तारुखेडले येथील श्री महालक्ष्मी मंदिराचा कायापालट झाला आहे. केवळ मनोरंजनासाठी सोशल मिडियाचा वापर होत नसून सामाजिक हितासाठीही त्याचा वापर करता येऊ शकतो, हे प्रशांत गवळी या तरुणाने जनसामान्यांना याव्दारे पटवून दिले आहे.
तारुखेडले येथील महालक्ष्मी मंदिर अनेक वर्षांपासून दुर्लक्षित झाल्याने बिकट अवस्था झाली होती. ही बाब लक्षात घेत तारुखेडले येथील सामाजिक कार्यकर्ते प्रशांत गवळी यांनी व्हाॅट्सअपसह अन्य सोशल मिडियाच्या माध्यमातून मित्र व इच्छुक देणगीदारांना आवाहन केले. त्याला प्रतिसाद देत देणगीदारांनी गुगल व फोन-पे द्वारे देणगी दिली. या माध्यमातून रु. ७२,३४४/- एवढी भरघोस रक्कम देणगी स्वरूपात जमा झाली. ही पूर्ण रक्कम मंदिर कामासाठी खर्च करण्यात आल्याने मंदिराजवळील मोठा ओठा व शेडचे बांधकाम करण्यात आले. तसेच मंदिराच्या बाहेर व आतून फरशी बसवून मंदिरात रंगकामही करण्यात आले. मंदिराचे नूतनीकरण झाल्यानंतर सत्यनारायण महापूजा  करण्यात आली. यावेळी पंचक्रोशीतील भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. तर काही दानशूरांनी वस्तूरूपातही दान केले. प्रवीण जगताप यांनी मंदिरासाठी घंटा दिला. वैभव जगताप यांनी समई तर नंदू जगताप व भारत आंधळे यांनी वाळू दिली. अनंत जगताप यांनी खडी दिली. निलेश वाघ यांनी पाटी व अंबादास गवळी यांनी लाईट फिटींग करून दिली. मंदिर कामासाठी तारुखेडले येथील ज्येष्ठ नागरिक पुंडलीक चव्हाण यांच्यासह अजित आंधळे, सुभाष जगताप, देविदास जगताप, राजू जगताप व गणेश गवळी, किरण चव्हाण, किशोर चव्हाण यांचे सहकार्य लाभले. गावातील तरुणांनीही महालक्ष्मी मंदिर सुशोभीकरणासाठी मोठ्या प्रमाणात श्रमदान केले. यापुढेही सोशल मिडियाच्या माध्यमातून सामाजिक कामे पार पाडण्यात येतील. तसेच इतर गावातील तरुणांनी समाजहितासाठी सोशल मिडियाचा सकारात्मक कामासाठी वापर करावा, असे आवाहन प्रशांत गवळी यांनी केले आहे. गावातील सागर जगताप, दगडू गवळी, प्रशांत शिंदे, पुजारी तुकाराम शिंदे, पंकज गवळी, शिवाजी गवळी, नवनाथ जगताप, राजेंद्र जोशी यांनीही मदत केली.
तारुखेडले येथील महालक्ष्मी मंदिराचा कायापालट होण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेतला. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळत मोठ्या प्रमाणात देणगी जमा झाली आणि मंदिराचे काम पूर्ण करण्यात आले. गावातले हे सामाजिक पाचवे काम असून, वेळोवेळी ग्रामस्थांनी साथ दिल्यानेच गावासाठी काहीतरी करता आल्याचे समाधान आहे. आतापर्यंत गावात २,७५,०००/- रुपयांची कामे देणगीव्दारे करण्यात आली आहे. – प्रशांत शरद गवळी, सामाजिक कार्यकर्ते, तारुखेडले.

हेही वाचा:

Back to top button