नाशिक : ऐन दिवाळीत किमती ऐवजांवर डल्ला सुरूच | पुढारी

नाशिक : ऐन दिवाळीत किमती ऐवजांवर डल्ला सुरूच

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गणेशोत्सव, नवरात्रोत्सवानंतर पोलिसांचा बंदोबस्त काहीसा कमी झाल्याचे बोलले जात असून, त्याचा फायदा चोरट्यांनी घेतलेला दिसतो. गत 10 दिवसांत चोरट्यांनी घरफोडी, वाहनचोरी, चोरी, जबरी चोर्‍या करून लाखो रुपयांच्या किमती ऐवजांवर डल्ला मारला आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर नागरिकांच्या किमती ऐवजांवर डल्ला मारण्याचे प्रकार सुरूच असून, त्यामुळे चोरट्यांना पकडण्याबरोबरच गुन्ह्यांवर अंकुश ठेवण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.

शहरात गेल्या काही दिवसांत जबरी चोरी, वाहनचोरी, चोरीचे प्रकार वाढले आहेत. रात्रीसह भरदिवसाही हे गुन्हे घडत असल्याने सर्वसामान्यांच्या किमती ऐवजावर चोरटे डल्ला मारत आहेत. विशेषत: वृद्धांना लक्ष्य करून त्यांच्याकडील महागड्या वस्तूंवर डल्ला मारत आहे. त्याचप्रमाणे घरात कोणी नसल्याची संधी साधून किंवा गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी चोरी, घरफोडी केल्या आहेत. त्यामुळे लाखो रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आहे. शहरातील विविध भागांमधून दुचाकी, चारचाकी वाहने चोरीस गेल्याप्रकरणी 24 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पाच ते 15 ऑक्टोबर या कालावधीत चोरी, जबरी चोरी, वाहनचोरी व घरफोडी या प्रकरणी 45 गुन्हे दाखल आहेत. त्यापैकी मोजकेच गुन्हे उघडकीस आले आहेत. त्याचप्रमाणे या कालावधीत शहरात खून, खुनाचे प्रयत्न, मारहाण, विनयभंगासारखे गुन्हेही घडले आहेत. आगामी काही दिवसांत दिवाळी येणार असल्याने नागरिक मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार करणार आहेत, तर दिवाळीनिमित्त अनेक जण बाहेरगावी जातील. अशा वेळी चोरट्यांची भीती घालविण्यासाठी पोलिसांनी गस्त वाढविण्यासोबतच, चोरट्यांची धरपकड करण्याची मागणी केली जात आहे.

दि. 5 ते 15 ऑक्टोबर दरम्यान दाखल गुन्हे असे…
घरफोडी 05
वाहनचोरी 24
चोरी 08
जबरी चोरी 08

हेही वाचा:

Back to top button