पुणे : अकरावी प्रवेशाची शेवटची संधी ; दैनंदिन गुणवत्ता फेरी 20 ऑक्टोबरपर्यंत | पुढारी

पुणे : अकरावी प्रवेशाची शेवटची संधी ; दैनंदिन गुणवत्ता फेरी 20 ऑक्टोबरपर्यंत

पुणे :  अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत अजूनही काही विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत असल्यामुळे येत्या गुरुवारपर्यंत (दि. 20) दैनंदिन गुणवत्ता फेरी म्हणजेच सतत विशेष फेर्‍यांचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना अकरावीच्या प्रवेशासाठी ही अंतिम संधी असणार आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह मुंबई, नाशिक, अमरावती, नागपूर महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या प्रवेशासाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. याअंतर्गत प्रवेश प्रक्रियेचा सध्या शेवटचा टप्पा सुरू आहे. प्रवेश प्रक्रियेअंतर्गत आतापर्यंत तीन नियमित फेर्‍या, तीन विशेष फेर्‍या आणि 26 सप्टेंबरपासून दैनंदिन गुणवत्ता विशेष फेर्‍यांचे आयोजन करण्यात आले आहे. तरीही आणखी काही विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत असल्याचे दिसून येत आहे.

अकरावीचे प्रथम सत्र संपत आले असताना प्रवेशाच्या प्रतीक्षेत असणार्‍या विद्यार्थ्यांना प्रवेशाची अखेरची संधी मिळावी म्हणून ही प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक असल्याचे स्पष्टीकरण माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाकडून देण्यात आले आहे.
विद्यार्थ्यांना अकरावीमध्ये प्रवेशासाठी ही अंतिम संधी असेल. त्याअंतर्गत कार्यवाहीचे टप्पेही संचालनालयाने संकेतस्थळावर जाहीर केले आहेत. यानंतर 2022-23 मधील प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईल आणि नवीन प्रवेशाची कार्यवाही बंद करण्यात येईल, असे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर यांनी स्पष्ट केले आहे.

दृष्टिक्षेपात प्रवेश प्रक्रिया
एकूण महाविद्यालये – 318
एकूण प्रवेश क्षमता – 111750
एकूण नोंदणी – 107858
कोटा प्रवेशक्षमता – 15411
कोटाअंतर्गत प्रवेश – 10180
कॅप प्रवेशक्षमता – 96339
कॅपअंतर्गत अर्ज -76049
एकूण प्रवेश – 78692
रिक्त जागा – 33058

हे लक्षात ठेवा…
नवीन विद्यार्थ्यांसाठी 17 ऑक्टोबरपर्यंत नोंदणी
प्रवेश अर्जाचा भाग एक भरून प्रमाणित झालेल्या विद्यार्थ्यांना भाग दोन आणि महाविद्यालय पसंती देऊन फेरीत सहभाग.
विद्यार्थ्याने दररोज भाग दोनमध्ये पसंती नोंदविणे आवश्यक.

Back to top button