

नाशिक, सिडको : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यातील शिक्षकांची अर्थवाहिनी असलेल्या नाशिक डिस्ट्रिक्ट सेकंडरी टीचर्स अॅण्ड नॉनटीचिंग एम्प्लॉई क्रेडिट सोसायटी अर्थात एनडीएसटीची निवडणूक शनिवारी (दि. 15) होत आहे. ऐन निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात विद्यमान संचालकांना गैरव्यवहार प्रकरणात उपनिबंधक कार्यालयाने क्लीन चिट दिल्याने त्यांना दिलासा मिळाला आहे. तर विरोधक बॅकफूटवर गेले आहेत.
एनडीएसटी सोसायटीत 21 जागांसाठी निवडणूक होणार आहे. सोसायटीत सत्ताधारी असलेले महाराष्ट्र राज्य टीडीएफ शिक्षक सेना, मुख्याध्यापक संघ शिक्षकेतर संघटना, आश्रमशाळा संघटना व समविचारी संघटनेद्वारे पुरस्कृत टीडीएफ प्रगती पॅनल तयार करण्यात आलेले आहे. पॅनलचे नेते माजी आमदार नानासाहेब बोरस्ते, कचेश्वर बारसे, संजय चव्हाण, बाळासाहेब सूर्यवंशी, शिवाजीराव निरगुडे, रवींद्र मोरे. इ. के. कांगणे, भाऊसाहेब शिरसाट या नेत्यांनी 21 जागांसाठी 21 उमेदवार जाहीर केले आहेत.
एनडीएसटी विकास समिती पुरस्कृत माजी आमदार डॉ. अपूर्व हिरे यांनी परिवर्तन पॅनलचे उमेदवार घोषित केले. या पॅनलचे नेते श्याम पाटील, के. के. अहिरे, साहेबराव कुटे, एस. बी. देशमुख, डी. यू. अहिरे, पुरुषोत्तम रकिबे, विजय पाटील, भगवान पानपाटील, प्रमोद पाटील हे पॅनलचे नेते प्रचाराची धुरा सांभाळत आहेत. फिरोज बादशाह, प्रकाश सोनवणे आणि आर. डी. निकम यांच्या नेतृत्वाखालील पीडीएफ/डीसीपीएस या तिसर्या पॅनलतर्फे उमेदवार रिंगणात आहेत. अंतिम टप्प्यात सर्व पॅनलने प्रचाराचा वेग वाढविला आहे.