कुटुंबासह एकत्र भोजन करणे ठरते लाभदायक | पुढारी

कुटुंबासह एकत्र भोजन करणे ठरते लाभदायक

वॉशिंग्टन : आपल्याकडे मोबाईल, टी.व्ही.चा काळ सुरू होण्यापूर्वीपर्यंत कुटुंबातील सर्वजण एकत्र बसूनच जेवण करीत असत. टी.व्ही. आल्यानंतर या ‘इडियट बॉक्स’कडे पाहत अनेकजण उदरभरण करू लागले. आता तर मोबाईलमुळे कुणी कुणाबरोबर बोलतही नाही असे चित्र आहे. मात्र, एकत्रित भोजन करण्याची जुनी पद्धतच आरोग्यासाठीही लाभदायक आहे, असे संशोधन आता झाले आहे. हे संशोधन आपल्याकडे नव्हे तर अमेरिकेत झाले आहे! पाश्चात्त्य देशांमध्ये आता खूश आणि निरोगी राहण्यासाठी ही ‘डीनर थेरपी’ लोकप्रिय होत आहे.

एकत्रिपणे जेवण करणे हा कौटुंबिक व व्यक्तिगत तणाव दूर करण्याचा ‘सिक्रेट फॉर्म्युला’ असल्याचे तिकडे म्हटले जात आहे. अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या माहितीनुसार 91 टक्के पालकांनी मान्य केले आहे की कुटुंबाने एकत्रितपणे जेवण केल्याने तणाव कमी होतो. ‘वेकफिल्ड रिसर्च’ने एक हजार अमेरिकन प्रौढ नागरिकांची ‘हेल्दी फॉर गुड मुव्हमेंट’नुसार एक पाहणी केली. त्यामध्ये आढळले की 84 टक्के लोकांना शक्य होईल तसेच आपल्या प्रियजनांसमवेत भोजन करण्याची इच्छा असते. सरासरी प्रौढ लोक निम्म्या वेळी एकटेच खात-पीत असतात ही वस्तुस्थिती आहे. प्रत्येक तीनपैकी दोन व्यक्तींनी म्हटले आहे की ते काही मर्यादेपर्यंत तणावग्रस्त आहेत तर 27 टक्के लोक अत्याधिक तणावात आहेत.

संशोधकांचे म्हणणे आहे की सातत्याने तणावाखाली राहिल्याने हृदयविकार आणि स्ट्रोकचा धोका वाढतो. जॉन हॉपकिन्समधील कार्डियोलॉजी डिपार्टमेंटचे सहयोगी संचालक व अमेरिकन हार्ट असोसिएशनचे प्रा.एम.एच.एस. एरिन मिचोस यांनी सांगितले की इतरांसमवेत जेवल्याने तणाव कमी होतो व आत्मसन्मानाला उत्तेजन मिळते. विशेषतः लहान मुलांना सामाजिक संबंधात सुधारणा करण्यासाठी ही चांगली संधी असते.

Back to top button