

नरेंद्र साठे
पुणे : जिल्ह्यातील मैलाप्रश्न सोडविण्यासाठी सुमारे दीड कोटीच्या 18 सक्शन मशीन जिल्हा परिषदेने खरेदीसाठी पुढाकार घेतला. मात्र, त्याच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष केले. परिणामी जिल्ह्यातील मैलाप्रश्न जैसे थे आहे. मशीन खरेदीची घाई केली, परंतु अंमलबजावणीचे नियोजन फसले. मशीनच्या उद्घाटनानंतर आठ महिन्यांनी खासगी संस्थेला या मशीन चालविण्यासाठी निविदा काढण्याच्या केवळ हालचालीच सुरू आहेत.
ग्रामीण भागात हगणदारीमुक्त योजना राबविताना अनेकांनी सेफ्टी टँक, शोषखड्डे तयार केले. मात्र, ते आता ओव्हरफ्लो झाल्याने नागरिकांना दुर्गंधीला सामारे जावे लागते. त्याबरोबरच आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, परंतु गावांमधील सेफ्टी टँक रिकामे करण्यासाठी शासकीय यंत्रणेकडे अद्याप तरी कुठल्याच उपाययोजना नाहीत, आहेत त्या केवळ कागदोपत्री.
मैलाप्रश्न वारंवार पुढे येत असल्याने जिल्हा परिषदेने पुढाकार घेऊन सक्शन मशीन खरेदी केल्या. वित्त आयोगाच्या जिल्हास्तरीय निधीतून या 18 मशीन खरेदी केल्या. एका मशीनची किंमत 8 लाख 90 हजार रुपये असून, दीड कोटींवर निधी खर्च केला. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटनही झाले, परंतु उद्घाटनापासून या मशीन बंदच आहेत.
मशीन खरेदी करताना त्यापुढील प्रश्नांचा विचारच केला नसल्याचे आता समोर येत आहे. कारण केवळ सक्शन मशीनच खरेदी करण्यात आल्या, त्यासाठी आवश्यक असलेली गाडी किंवा ट्रॅक्टर खरेदी केले नाहीत. मैला उचलल्यानंतर तो कुठे टाकायचा, त्यासाठी लागणार्या परवानग्या घेतल्या नव्हत्या. ते चालविण्यासाठी ग्रामपंचायतींना निधी कसा उपलब्ध होईल, ड्रायव्हर, देखभाल दुरुस्तीचा खर्च याबाबत कुठलेही नियोजन झाले नव्हते. आता या सर्व मशीन खासगी संस्थेला चालविण्यासाठी देण्यात येणार आहेत, परंतु आता हे नागरिकांसाठी मोफत नसेल, त्यासाठी दर आकरणी केली जाणार आहे.
मोफत मिळणार नाही…
निविदा प्रक्रियानंतर प्रत्यक्षात सक्शन मशीन नागरिकांच्या सेवत दाखल होतील. मात्र, त्यासाठी नागरिकांना सेफ्टी टँक रिकामा करण्यासाठी शुल्क आकारले जाणार आहे, ते मोफत नसेल. परंतु, खासगी व्यावसायिकांच्या तुलनेत कमी असेल असे जिल्हा परिषदेकडून स्पष्ट करण्यात आले. एका मशीनची क्षमता 3 हजार लिटर आहे.
या गावांसाठी मशीन
वारुळवाडी, ओतूर, चिंबळी, चर्होली खु., अवसरी बु., निंबुत, भिगवण, अंथुर्णे, निराशिवतक्रार, रांजणगाव गणपती, हिंजवडी, भूगाव, कार्ला, कामशेत, इंदोरी, उरुळी कांचन, लोणी काळभोर अशा 17 तसेच भोर तालुक्यातील एक याप्रमाणे 18 ग्रा.पं. ना सक्शन मशीन दिल्या आहेत. आवश्यक परवानग्या घेतल्या आहेत. आता निविदा प्रक्रियेनंतर खासगी संस्थेकडून सक्शन मशीन चालवल्या जातील. याचे दर निश्चित केले आहेत. ड्रायव्हर, डिझेल, देखभाल दुरुस्ती या तीन गोष्टी लोकांकडून घेतले जाणार आहे. ग्रामपंचायत क्षेत्रासाठी नसेल
तर पूर्ण तालुक्यासाठी असणार आहे. वॉर रूममध्ये त्याची बुकिंग करता येणार आहे. नि:शुल्क टोलफ—ी नंबर देण्यात येईल. बुकिंग केल्यानंतर 24 तासांमध्ये सक्शन मशीन पोहोचण्याची व्यवस्था केली आहे.
आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. पुणे.