आरटीओ : बेशिस्त वाहनचालक; राज्यात नाशिक अव्वल | पुढारी

आरटीओ : बेशिस्त वाहनचालक; राज्यात नाशिक अव्वल

नाशिक (पंचवटी) : गणेश बोडके
नाशिक प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (आरटीओ) बेशिस्त वाहनधारकांवर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली असून, एकूण 35 हजार 877 वाहनांवर कारवाई करत सुमारे 10 कोटी 13 लाखांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी प्रदीप शिंदे यांनी दिली. बेशिस्त वाहनचालकांवरील कारवाई अंतर्गत ओव्हर स्पीड व विनाहेल्मेट वाहन चालवणे या कारवाईतील दंड वसुलीमध्ये नाशिक प्रादेशिक परिवहन विभागाने मोठ्या प्रमाणात कारवाई करत राज्यात अव्वलस्थान मिळवले आहे.

जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार प्रादेशिक परिवहन विभागाने केलेल्या कारवाईतील निष्कर्षानुसार नाशिकमध्ये सर्वांत जास्त अपघात हे ओव्हर स्पीड आणि विनाहेल्मेट वाहन चालविण्यामुळे झाल्याचे आढळून आले आहे. यामध्ये जानेवारी 2021 ते ऑगस्ट 2022 पर्यंत एकूण 35 हजार 877 वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, 10 कोटी 13 लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. विहित वेगमर्यादेपेक्षा वेगाने वाहन चालविणार्‍या वाहनधारकांवर राज्यामध्ये सर्वाधिक कारवाई नाशिकच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयाने केली आहे. त्यामध्ये सन 2021-22 मध्ये एकूण 4,594 वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली आहे. तर सन 2022-23 मधील 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर 2022 या सहा महिन्यांत सुमारे 11 हजार 591 वाहनधारकांवर कारवाई करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर राज्यामध्ये सर्वाधिक कारवाई नाशिक कार्यालयाकडून करण्यात आली आहे. सन 2021-22 मध्ये एकूण 3 हजार 627 दुचाकीस्वारांवर कारवाई करण्यात आलेली होती. तर 2022-2023 या वर्षातील 1 एप्रिल ते 30 सप्टेंबर 2022 दरम्यान एकूण 3,047 दुचाकीचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच खासगी बस व अवैध प्रवासी वाहतुकीच्या विरोधात केलेल्या मोहिमेमध्ये एप्रिल 2021 ते सप्टेंबर 2022 या कालावधीमध्ये 4 हजार 143 वाहनांची तपासणी करण्यात आली असून, यातील 756 दोषी वाहनांकडून दंड व कर स्वरूपात एकूण 20 लाख 48 हजार 925 रुपये इतका महसूल वसूल करण्यात आला आहे.

वेगाने वाहन चालविणे : 
2021-2022 मध्ये  4,594 तर 2022-2023 मध्ये 11,591
विना हेल्मेट वाहन चालविणे :
2021-2022 मध्ये 3,627 तर 2022-2023 मध्ये 3,047
खासगी बस/अवैध वाहतूक :
2021-2022 मध्ये 4,143

तर आत्तापर्यंत 20,48,925 इतका दंड वसूल करण्यात आला आहे.

हेही वाचा :

Back to top button