परतीच्या पावसाने वाल्हे परिसरात पिकांची दैना; पिके काढणीची कामे खोळंबली

परतीच्या पावसाने वाल्हे परिसरात पिकांची दैना; पिके काढणीची कामे खोळंबली
Published on
Updated on

वाल्हे; पुढारी वृत्तसेवा: मागील दोन-तीन दिवसांपासून परतीच्या मुसळधार पावसाने वाल्हे (ता.पुरंदर) परिसराला झोडपले आहे. खरीप हंगाम वाया जाण्याची भीती निर्माण असून झाली आहे. शेतातील पाणी निघत नसल्याने पिके कुजू लागली आहेत. बाजरी, मूग, तूर, सोयाबीन, घेवडा, भुईमूग, सूर्यफूल, मका आदी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. खरीप पिकांवर अतिवृष्टीचा विपरीत परिणाम होत आहे. पावसामुळे शेतीतील पिके काढणीची कामे खोळंबली आहेत. पिके आणि तण एकसारखीच वाढली आहेत. पाऊस उघडीप देत नसल्याने तूर, मूग, भुईमूग, सूर्यफूल, घेवडा, चवळी ही कडधान्ये पिके जागेवर कुजत आहेत.

इतर पिकांची वाढही उन्हाअभावी खुंटली आहे. कीड व रोगराईलाही निमंत्रण मिळत आहे. शेतकर्‍यांपुढे संकटांची मालिका सुरू झाली आहे. हातातोंडाशी आलेल्या खरिपातील सर्वच पिके वाया जाण्याची भीती असल्याने चिंतेत भर पडली आहे. मागील दोन वर्षे कोरोना काळात याच शेतकर्‍यांनी सर्वांना तारले. आता याच बळीराजावर अतिपावसामुळे उपासमारीची वेळ येते की काय असा ? प्रश्न उभा राहिला आहे. अनेक महिला- पुरूष दुसर्‍यांच्या शेतात शेतमजुरी करून घरखर्च भागवत असतात. मात्र, त्यांची मजुरीही मंदावली आहे. दिवाळीचा सण गोड जाणार की दिवाळे काढणार, हीच चिंता सर्वांना आहे.

फवारणीचा खर्चही वाया
पिकांवरील वाढत्या कीड-रोगांमुळे पिकांवर औषध फवारणी करूनही उपयोग होत नाही. औषधे फवारली तरी पावसामुळे ते वाया जात आहे. रोग आटोक्यात येत नसल्याने पिके सोडून देण्याची वेळ आली आहे. भाजीपाला, फळ पिकांचे मोठे नुकसान होत असून, केलेला खर्चही निघणार नसल्याने जगायचे कसे ? असा प्रश्न पडला आहे. चारा पिकेही वाया गेली असून भविष्यातील चाराटंचाईनेही बळीराजा चिंताक्रांत झाला आहे.

रब्बी पेरण्यांनाही होतोय उशीर
यंदा मुबलक पाऊस आणि शाश्वत पाण्यामुळे रब्बीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. ऑक्टोबरचा पहिला आठवडा उलटला तरीही किमान जिरायती भागात रब्बी पेरण्यांची लगबग सुरू झालेली नाही. जमिनीला वाफसाच नसल्याने, शेतकर्‍यांनी पेरण्यांचे धाडस केले नाही. पावसाने उघडीप दिल्यावर आठवडाभरात जिरायती भागातील रब्बी पेरणीस सुरुवात होईल, असे शेतकर्‍यांनी सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news