बारामती प्लास्टिकमुक्त करणार : खासदार सुप्रिया सुळे | पुढारी

बारामती प्लास्टिकमुक्त करणार : खासदार सुप्रिया सुळे

पिरंगुट; पुढारी वृत्तसेवा: बारामती लोकसभा मतदारसंघ हा प्लास्टिकमुक्त करून कचर्‍यावर नियंत्रण आणायचे असल्याचे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी पिरंगुट येथे व्यक्त केले. पिरंगुट येथील पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अनंतराव पवार महाविद्यालयामध्ये विद्यार्थी आणि खासदार सुसंवाद कार्यक्रमामध्ये त्या बोलत होत्या. मुळशी तालुका हा निसर्गसंपन्नतेने नटलेला तालुका असून, घाटामध्ये तसेच मुख्य रस्त्यावर अनेक ठिकाणी कचरा टाकला जातोय. त्यामुळे या ठिकाणी प्रदूषण होत आहे. बाहेरून येणार्‍या पर्यटकांना तसेच रस्त्यावर कचरा टाकणार्‍या नागरिकांना समजून सांगा, नाही ऐकले तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा, असा सल्लाही या वेळी खा. सुळे यांनी दिला.

या वेळी अनेक विद्यार्थ्यांनी खासदारांना प्रश्न विचारले. त्यामध्ये पिरंगुट कॅम्प ते महाविद्यालय रस्त्याचे रुंदीकरण तसेच विद्यार्थ्यांसाठी बससेवा उपलब्ध करून देणे, बाहेरगावाहून शिकण्यास आलेल्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह यासह अनेक प्रश्न त्यांनी मांडले. या वेळी पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या वतीने सुरू केलेल्या महिला आर्थिक साक्षरता अभियानाची मुळशी तालुक्यात सुरुवात करण्यात आली. त्यामध्ये विद्यार्थिनींचे बँकेत खाते उघडून त्यांना खाते पुस्तक खा. सुळे यांच्या हस्ते देण्यात आले.

या वेळी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे मानद सचिव संदीप कदम, पुणे जिल्हा सहकारी बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महादेव कोंढरे, मुख्याध्यापिका शर्मिला चौधरी, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सविता दगडे, राष्ट्रवादीच्या तालुका महिला अध्यक्षा दिपाली कोकरे, राजाभाऊ हगवणे, दगडूकाका करंजावणे, शंकरकाका पवळे, सागर धुमाळ आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Back to top button