

निफाड : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा
नवरात्र संपून आठ दिवसावर दिवाळी आलेली असताना देखील पावसाळा संपण्याचे कोणतेही लक्षण दिसून येत नाही आहे. पावसाळ्यात बरसावा तसा मुसळधार पाऊस गेल्या काही दिवसांपासून सातत्याने निफाड तालुक्यात कोसळत आहे. त्यामुळे मका, सोयाबीन, कांदा, टोमॅटो, आणि महत्त्वाचे म्हणजे द्राक्ष या सर्वच पिकांना या मुसळधार पावसाचा फटका बसतो आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.
ज्या पर्जन्य राजाची शेतकरी राजा आतुरतेने वाट बघायचा तो आता कधी जाईल असे होऊन गेले आहे. सोयाबीन पिकाची सोंगणी आता ठीकठिकाणी सुरू व्हायला लागली असताना पाऊस पाठ सोडत नसल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी हवालदिल होऊन गेला आहे. कांदा व टोमॅटो तसेच मका या पिकांना देखील या अतिवृष्टीचे फटके सोसावे लागत आहेत. निफाड तालुक्यात द्राक्षाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते परंतु पाऊस थांबत नसल्यामुळे द्राक्ष उत्पादकांपुढे जीवन मरणाचा प्रश्न उभा ठाकला आहे.
ऑक्टोबर महिना हा द्राक्ष बागायतदारांसाठी तसेच द्राक्ष मजुरांसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. साधारणपणे ऑक्टोबर महिन्यामध्ये द्राक्ष बागेत छाटणीची कामे वेग घेत असतात. आता ऑक्टोबरचा अर्धा महिना उलटून गेला तरी छाटणीच्या कामे सुरू करता येत नसल्याने यंदाचा द्राक्ष हंगाम धोक्यात येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. तालुक्यामध्ये दररोज कोठे ना कोठे ढगफुटी सदृश्य पाऊस होत असल्याने शेतकरी वर्गामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सरासरीच्या दुप्पट पेक्षा देखील जास्त पाऊस झालेला असून अजून देखील पाऊस थांबत नसल्यामुळे शासनाने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज आहे, परंतु शेतकऱ्यांच्या हितासाठी कसलाही निर्णय होत नसल्याची खंत अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.