बारमालकाने तळीरामांना घरी सोडावे?, स्वस्त दारु मिळणाऱ्या गोव्यात काय आहे वास्तव... | पुढारी

बारमालकाने तळीरामांना घरी सोडावे?, स्वस्त दारु मिळणाऱ्या गोव्यात काय आहे वास्तव...

पणजी : सुरेश गुदले : रोग रेड्याला आणि औषध पखाल्याला अशी एक म्हण आहे. यालाच तुघलकी कारभारही म्हणता येईल. तुघलकी मंडळी सांप्रतकाळीही भेटत असतात. ती काय निर्णय घेतील, त्याचा काही नेम नसतो. तर्र तळीरामांना घरी पोहोचविण्याची जबाबदारी बार मालकांवर राहील, असा कायदा गोव्यात केला जाणार आहे. आता बोला?

आधीच मर्कट त्यात मद्य प्याला अशा तळीरामांनी वाहन चालवून इतरांचा जीव घेऊ नये म्हणून त्यांना घरी पोहोचविण्याची जबाबदारी गोव्यातील बार मालकांवर राहील. बार मालकाने तर्रर्र तळीरामांना वाहन चालवू देऊच नये, अशी गोवा सरकारची अपेक्षा. लवकरच तसा कायदा करणार असल्याची गगनभेदी गर्जना गोव्याचे वाहतूकमंत्री माविन गुदिन्हो यांनी पुन्हा केली आहे. ती अर्थातच लक्षवेधी आणि लोकप्रिय.

दारूची नशा आणि जीवनाची दुर्दशा अशा आशयाची गोष्ट सांगणारे संगीत एकच प्याला नाटक. ते खूप गाजलेले. शंभर वर्षापूर्वीचे नाटक. या नाटकाचे खेळ आजही होत असतात. अशा प्रकारच्या कलाविष्कारांमुळे ना दारूड्यांची संख्या कमी झाली ना उत्पादन. तशी अपेक्षा करणे म्हणजे मुर्खांच्या नंदनवनातच राहणे. तात्पर्य काय तर हा समाज कधी किर्तनाने सुधारलेला नाही आणि कधी तमाशाने बिघडलेला नाही. वास्तव काय आहे? तुम्हाला पटो अथवा न पटो, दारूच्या समर्थनाचा तर प्रश्नच नाहीच नाही, पण गोव्यात स्वस्तात मिळणारी दारू हा आहे गोव्याच्या पर्यटनाचा अनमोल पैलू. आता काय बोलणार? तात्पर्य काय तर तळीरामांना घरी पोहोचविण्याची जबाबदारी बार मालकांची असा कायदा झाला तरी तो कागदावर गाढ झोपून राहील. हा कायदा म्हणजे आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी असाच प्रकार होण्याची शक्यताच अधिक. कोण म्हणते असे? तर लोकच म्हणतात. पिणारे आणि न पिणारे. तुम्ही विचाराल- कशावरून ? तर समाजमाध्यमावरून साभार.

मधमाशांच्या पोळ्यावर दगड मारल्यावर माशांचे मोहोळ उठते. त्याप्रमाणे समाजमाध्यामात वाहतूक मंत्र्यांच्या घोषणेवर खिल्ली उडविणारे मोहोळ उठले आहे. कायद्यामुळे हा प्रश्न सुटणार नाही, असा या खिल्लीचे कॉकटेल. जेे अपेक्षितच. लोकभावनेचा एक टेस्टर. दारू पिऊन वाहन चालविल्यामुळे गोव्यात लक्षणीय संख्येने अपघात होतात. माणसे किड्या-मुंग्यांप्रमाणे रस्त्यावर मरतात. त्यामुळे मंत्र्यांच्या हेतूविषयी शंका घेण्याचे कारण नाही. प्रश्न आहे तो धोरणात्मक वाटचालीचा. अर्थकारणाचा. त्यामुळे वरवरच्या मलमपट्टीमुळे मूळ रोग नाहीसा होणार नाहीच. तो सूजतच राहील. नाही तर सध्या काय होते आहे?

गोव्यात अंतर्गत रस्त्यावर, महामार्गावर पानपट्टीच्या दुकानांप्रमाणे वाईनशॉप, बार आहेत. कोणी दिले हो परवाने? प्रार्थनास्थळांच्या परिसरात, शाळेजवळ आहेत. असे असू नये यासाठी नियम आहेत की नाही? अनेक ठिकाणी तर बार 24 तास सुरू असतात. कोण लक्ष देतो? सरकारच्या नियमानुसार अनेक ठिकाणी वाईन शॉप, बार वेळेवर बंद होतात-ते कागदावर. प्रत्यक्षात बाहेरून कीर्तन-आतून तमाशा सुरू असतो. कोण करतो कारवाई? समुद्र किनारपट्टीत तर उत्तररात्रीपर्यंत वाद्यांचा दणदणाट सुरू असतो. कोणाच्या अर्थपूर्ण परवानगीने? त्यानंतर तळीरामांची वाहने घराच्या, हॉटेलच्या दिशेने बेभान सुटतात. अशावेळी कोणता बार मालक या मंडळींना घरी सोडविण्याची जबाबदारी घेणार? उत्तररात्री? काय मजाक आहे ना? काही शहरात कामगार वर्गाच्या सोयीसाठी पहाटे तीनला, चारला दारूची दुकाने, बार उघडले जातात. (काही कामे अशी असतात की पिल्याशिवाय कामगारांना ती करताच येत नाहीत म्हणे. विषयानंतर नव्हे विषयविस्तार) कोण-काय आणि काही करत का नाही? त्यामुळे समाज माध्यमात या घोषणेची टोपी टणाणा उडवली जाते आहे.

दारूबंदी असलेल्या राज्यात, शहरात, गावातील भन्नाट किस्से काय सांगावा देतात? लोक सीमेवरील गावात जाऊन ढोसतात. कागदावर सिंधुदुर्ग जिल्ह्यात पण गोव्याच्या सीमेवरील गावा-गावातील लोक गोव्यात येऊन बैठक मारतात. कर्नाटकच्या सीमेवर पण गोव्याच्या हद्दीतील सुर्ला गावात घरे होती 40 आणि बार होते 12. कर्नाटकातील सीमेवरील तमाम तळीराम गोव्याच्या या गावात. तर्र तळीराम लोकांच्या घरात घुसू लागले. अंडी, चिकन मिलता है क्या? अशी विचारणा. ग्रामस्थ वैतागून एकवटले आणि सर्व बारा बार बंद पाडले. तात्पर्य काय तर समाज आणि सरकारने ठरवले तर आणि तरच संपूर्ण दारूबंदी शक्य. म्हणतात ना -गाव करील ते राव काय करील? तूर्त इतकेच पेग पुरे.

हे वाचलंत का?

Back to top button