पिंपळनेर : कांद्याला ८०० रुपये क्विंटल भाव | पुढारी

पिंपळनेर : कांद्याला ८०० रुपये क्विंटल भाव

पिंपळनेर : पुढारी वृत्तसेवा

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक वाढल्याने भाव घसरले आहेत. काही दिवसांपूर्वी भाववाढीमुळे ग्राहकांच्या डोळ्यातून पाणी आणणारा कांदा आता शेतकऱ्यांच्या डोळ्यातून पाणी आणत असल्याचे चित्र आहे.

मागील वर्षी कांद्याचे दर २ हजार ५०० ते ४ हजार रुपये क्विंटलपर्यंत गेले होते. यंदा हेच दर प्रतिक्विंटल ७०० ते ८०० रुपयांवर आल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. साक्री तालुक्यातील अनेक शेतकरी कांद्याची लागवड करतात. मागील काही वर्षांचा अनुभव पाहता यंदाही कांद्याला चांगला भाव मिळेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. परंतु अपेक्षा फोल ठरत आहेत. मजुरी, बियाणे, खत, औषधांच्या दरात वाढ झाल्याने शेतकऱ्यांचा कांदा लागवडीपासून काढणीपर्यंत एकरी ६० ते ७० हजार रुपये खर्च झाला आहे. दुसरीकडे कांद्याचे दर घसरत असल्याने शेतीचा खर्चही निघणे कठीण झाले आहे. कांदा काढल्यानंतर शेतकरी भाव वाढण्याच्या अपेक्षेतूनच कांदा साठवून ठेवतात. साठवण केलेल्या कांद्याचीही काही दिवसांची मर्यादा असते. साठवलेला कांदाही सडण्याचा धोका असल्याने शेतकऱ्यांनी मिळेल त्या भावात कांदा विक्रीस प्राधान्य दिले आहे. पिंपळनेर येथील कांदा मार्केट साक्री तालुक्यातील मोठे मार्केट मानले जाते. या ठिकाणी सामोडे, चिकसे, शिरवाडे, जेबापूर, रोहन शेणपूर, धाडणे आदी भागांतील शेतकरी कांदे विक्रीसाठी या ठिकाणी येतात. कांद्याला सरासरी प्रतिक्विंटल ७०० ते ८०० रुपये भाव मिळत असल्याने वाहतुकीचा खर्चही निघत नसल्याची स्थिती आहे.

हमीभाव दिला जावा…

कांदा लागवडीनंतर अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला होता. आवक जास्त तर मागणी कमी अशी परिस्थिती निर्माण झाल्याने भावात घसरण होत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. शासनाने कांद्याला हमीभाव निश्चित करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

कांदा उत्पादनावर लाखो रुपये खर्च करूनही प्रतिक्विंटल ७०० ते ८०० भाव मिळत असल्याने खर्चही निघणेही कठीण झाले आहे. – दिनेश पंखेवाले,शेतकरी पिंपळनेर

हेही वाचा:

Back to top button