धुक्यात गारठले मावळ; कार्ल्यात बोचर्‍या थंडीची सुरुवात | पुढारी

धुक्यात गारठले मावळ; कार्ल्यात बोचर्‍या थंडीची सुरुवात

कार्ला : पुढारी वृत्तसेवा : परतीचा पाऊस सुरू असून, सोमवारी मुसळधार पाऊस झाल्यानंतर मंगळवारी सकाळी बोचर्‍या थंडीबरोबरच संपूर्ण मावळ तालुक्यात सकाळी साडेनऊ वाजेपर्यंत दाट धुके पडत असून धुक्याची चादर निर्माण झाल्याचे चित्र सकाळी दिसून येत आहे. दररोज पडत असलेल्या पावसाने वातावरणामुळे हवेतील गारवा कमी झाला होता. परंतु, आता पहाटेच्या सुमारास हवेतील गारव्यामुळे पहाटेच्या वेळी दाट धुके पसरलेले दिसून येत आहे.

सकाळी आठ ते साडेआठच्या दरम्यान धुक्याचे प्रमाण जास्तच वाढले होते. या धुक्यात रस्ते वाहतूक मंद झाली होती. पशू, पक्षी यांचीही वाट काही काळ हरवली असल्याचे पाहायला मिळत आहे. मावळात सकाळी धुके, तर दिवसभर गारठा जाणवत होता. गाड्यांचे दिवे व लाल रंगांचे इंडिकेटर लावून गाड्या चालवल्या जात होत्या. वाहनचालकही धिम्या गतीने गाडी चालवताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून पाऊस ऊन, तर संध्याकाळी थंडी जाणवत असून सकाळी दाट धुके पडत असल्याने त्याचा परिणाम जनजीवनावरही होत आहे. धुक्यामुळे सूर्यदर्शन उशिरा होत आहे.

Back to top button