Nashik accident : 12 पैकी तिघांच्या मृतदेहाची ओळख नाही, ‘डीएनए’ची प्रतीक्षा | पुढारी

Nashik accident : 12 पैकी तिघांच्या मृतदेहाची ओळख नाही, ‘डीएनए’ची प्रतीक्षा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
खासगी बस व आयशर अपघातात होरपळून 12 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये नऊ जणांची ओळख पटवण्यात प्रशासनास यश आल्याने त्यांचे मृतदेह नातलगांच्या स्वाधीन करण्यात आले आहेत. मात्र, 100 टक्के भाजल्याने तिघांच्या मृतदेहाची ओळख पटवणे अवघड झाल्याने त्यांची डीएनए चाचणी करण्यात आली आहे. डीएनए अहवाल आल्यानंतर मृतदेह नातलगांना सोपवण्यात येणार असल्याचे जिल्हा रुग्णालयाने सांगितले.

शनिवारी (दि.8) पहाटे नाशिक-औरंगाबाद रोडवरील मिरची हॉटेल चौफुलीवर पहाटे साडेचार ते पाचच्या सुमारास खासगी बस व आयशर यांच्यात भीषण अपघात झाला. अपघातानंतर बसने पेट घेतल्याने आगीत बसमधील चालकासह 12 जणांचा होरपळून मृत्यू झाला. मृतदेहावरील दागिने, कपडे, करदोडा, खिशातील तिकिटे यावरून नऊ मृतदेहांची ओळख पटवून नातलगांना मृतदेह सोपवण्यात आले. उर्वरित तीन मृतदेहांपैकी दोघांची ओळख नातलगांनी पटवली. मात्र, खबरदारी म्हणून प्रशासनाने तिघा मृतदेहांची डीएनए चाचणी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार डीएनए चाचणी करण्यात आली असून, त्यांचा अहवाल सोमवारी (दि.10) रात्री आठपर्यंत प्रलंबित होता. तिघांचा अहवाल सोमवारी रात्री उशिरा किंवा मंगळवारी सकाळी प्राप्त होण्याची शक्यता यंत्रणेने वर्तवली आहे. डीएनए अहवालानंतरच मृतदेहांचा ताबा नातलगांना सोपवण्यात येणार आहे.

अशी आहेत मृतांची नावे
– अजय ऊर्फ शंकर मोहन कुचनकार (18, रा. मारेगाव रोड, जि. यवतमाळ), जितेंद्र रामपाल चंद्रशंकर (40, रा. राजाकिनी, जि. वाशीम), कल्याणी आकाश मुंढोळकर (3), पार्वतीबाई नागोराव मुंढोळकर (55, दोघे रा. बीबी, लोणार, जि. बुलडाणा), उद्धव पंढरी भिलंग (55, रा. तरोडी, जि. वाशीम), सुरेश लक्ष्मण मुळे (50, रा. बोरखडी, पुसद, जि. यवतमाळ), ब—ह्मदत्ता सोगाजी मनवर (बसचालक) (45, रा. पोहरादेवी, जि. वाशीम), वैभव वामन भिलंग (35, रा. तरोळी, जि. वाशीम), अशोक सोपान बनसोड (58, रा. बेलखोडा, जि. वाशीम) या नऊ जणांचा मृतदेह नातलगांच्या ताब्यात देण्यात आला आहे. तर गजानन शालीकराम लोणकर (23, रा. आसेगाव, ता. रिसोड, जि. वाशिम) व हरिभाऊ तुकाराम भिसनकर (28, रा. वाटखेड. जि. यवतमाळ) यांच्यासह आणखी एका मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचणी करण्यात आली आहे.

अपघातातील नऊ मृतदेह त्यांच्या नातलगांच्या स्वाधीन करण्यात आलेले आहेत. तीन मृतदेहांचे डीएनए घेण्यात आले आहेत. अहवाल प्राप्त झाल्यानंतर मृतदेह नातलगांच्या स्वाधीन केले जातील.
– डॉ. अशोक थोरात, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय

हेही वाचा :

Back to top button