बालाजी रथोत्सव : धुळ्यात वेंकटरमण गोविंदाचा गजर

धुळे : पुढारी वृत्तसेवा
“व्यंकट रमण गोविंदा” ‘नावाचा जयघोष करीत भगवान बालाजीच्या रथोत्सवास उत्साहात सुरुवात झाली आहे. येथील रथोत्सवास 140 वर्षांची परंपरा असून गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे रथोत्सवावर मर्यादा आली होती. यंदा खाकीसह हजारो भाविकांनी बालाजीच्या नावाचा जयघोष करीत यात्रोत्सवात सहभाग नोंदवला आहे.
शहरातील गल्ली क्रमांक चारमध्ये पुरातन बालाजी मंदिर असून मंदिरापासून गुरुवारी, दि.6 रथोत्सवाला सुरुवात करण्यात आली. रथोत्सवाच्या आरतीचा मान परंपरेनुसार स्वर्गीय बाबूलाल अग्रवाल यांची वारसदार कमालनयन अग्रवाल व त्यांच्या परिवाराला देण्यात आला. आरती व विधिवत पूजनानंतर रथ उत्सवाला सुरुवात झाली. तत्पूर्वी रथ फुलांच्या माळांनी सजवण्यात आला. रथाच्या पुढील बाजूला फुलांनी भगवान महादेव, नंदी आणि त्रिशूल असे सजवण्यात आले. भाविकांनी गर्दी केल्याने भगवान बालाजीच्या मंदिर परिसराला यात्रेचे स्वरूप आले. तसेच रथ जाणाऱ्या मार्गावर आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या. ठिकठिकाणी चौकांमध्ये रथावर पुष्पवृष्टी करण्यात आली. त्याचप्रमाणे आग्रा रोडवर सामाजिक संस्थांच्या वतीने भाविकांसाठी अल्पोपहार पाणी तसेच थंड पेयाची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली. रथोत्सव पाहण्यासाठी ग्रामीण भागातून हजारो भाविक हजेरी लावतात. आग्रारोडच्या दुतर्फा भाविकांनी भगवान बालाजीचे दर्शन घेण्यासाठी गर्दी केली. भगवान बालाजीला केळीचा प्रसाद चढवला जातो. रथोत्सवाच्या समोर पारंपरिक वाद्य आणि नृत्यामुळे वातावरण भक्तीमय झाले.

हेही वाचा:
- जेजुरीच्या डोंगर खोऱ्यात तब्बल अठरा तास रंगला मर्दानी दसरा सोहळा, रमणा डोंगरात पहाटे तीन वाजता झाली देवभेट
- कोल्हापूर : वडणगेत चोरट्यांनी दोन घरे फोडली, लाखोंचा ऐवज लंपास
- बॉलिवूडच्या या पॉवर कपलच्या डिव्होर्सच्या चर्चेदरम्यान घडलं असं काही की…