कोल्हापूर : वडणगेत चोरट्यांनी दोन घरे फोडली, लाखोंचा ऐवज लंपास | पुढारी

कोल्हापूर : वडणगेत चोरट्यांनी दोन घरे फोडली, लाखोंचा ऐवज लंपास

वडणगे (कोल्हापूर) : पुढारी वृत्तसेवा : वडणगे (ता. करवीर) येथील जाधव मळा व कालेकर मळा या ठिकाणी चोरट्यांनी दोन घरे फोडली. जाधव मळा येथे राहत्या घरातून सव्वा पाच तोळे सोन्याचे दागिने व रोकड मिळून सुमारे सव्वा लाख रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. तर कालेकर मळ्यातील पाच अश्वशक्तीची मोटर चोरट्यांनी लांबवली. गुरुवारी सकाळी चोरीचे प्रकार उघडकीस आले.

जाधव मळा येथे पोपट रंगराव जाधव हे आपल्या कुटुंबीयांसह राहतात. जुन्या घरासमोरच त्यांनी नवीन घर बांधले आहे. बुधवारी दसऱ्याचा धार्मिक विधी करून त्यांचे कुटुंब समोरच्या घरात झोपण्यास गेले. चोरट्यांनी ही संधी साधून जुन्या घरातील मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. चोरट्यांनी डब्यात ठेवलेले सव्वातीन तोळ्याचे गंठण , दोन तोळ्याचा लक्ष्मी हार आणि दोन ग्रॅम वजनाची सोन्याची रिंग व सातशे रुपयांची रोकड चोरून नेली.आज पहाटे साडेपाचच्या सुमारास सरिता पंडित जाधव यांना जुन्या घराचा दरवाजा उघडा असल्याचा दिसला.

घरात जाऊन पाहिल्यावर डब्यातील दागिने व रोकड चोरीला गेल्याचे समजले. याबाबत पंडित जाधव यांनी करवीर पोलीस तक्रार दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला यावेळी ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. श्वान ही परिसरातच घुटमळले.
दरम्यान, या परिसरापासून काही अंतरावर असलेल्या कालेकर मळा परिसरातही चोरी झाली. आज सकाळी नऊ वाजता विलास बोंगाळे यांच्या मालकीच्या शेतातील घरात अवजारे असलेल्या खोलीचे कुलूप शहाजी रामचंद्र कदम यांना तुटलेले दिसले. कदम यांनी आत जाऊन पाहिल्यानंतर पाच अश्वशक्तीची मोटर चोरीला गेल्याचे निदर्शनास आले.

Back to top button