जळगाव : पुढारी वृत्तसेवा
सध्या सायबर क्राईमच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे. आपल्या अवतीभोवती फसवणुकीचे अनेक प्रकार पाहत असतो. तरीदेखील लोक भुलथापांना बळी पडून स्वत:ची फसवणूक करुन घेतात. असाच एक प्रकार जळगाव जिल्ह्यात उघडकीस आला आहे. सोशल मिडीयावर अनोळखी व्यक्तीशी मैत्री केल्याचे एका २७ वर्षीय तरुणीला चांगलेच महागात पडले आहे. या व्यक्तीने गिफ्ट पाठविण्याच्या नावाखाली तरुणीची साडेसहा लाखात फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्ह्यातील एका २७ वर्षीय तरुणीची तीन महिन्यापूर्वीच इन्स्टाग्रामच्या माध्यमातून डॉ. मार्क नामक व्यक्तीशी मैत्री झाली होती. मैत्रीत विश्वास संपादन करीत संबंधीत व्यक्तीने महागडे गिफ्ट पाठवीत असल्याचे तरुणीला सांगितले. गिफ्ट स्वीकारण्यासाठी वेळोवेळी वेगवेगळ्या खात्यात तरुणीला वेगवेगळ्या बँक खात्यांवर पैसे टाकण्यास सांगितले. काही दिवसात तरुणीने तब्बल ६ लाख ४९ हजार रुपये खात्यात टाकले. मात्र पैसै पाठवूनही गिफ्ट न मिळाल्याने तरुणीने सायबर पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
सायबर पोलिसात गुन्हा दाखल…
पैसे ऑनलाईन स्विकारून कोणतेही गिफ्ट न पाठवता आपली फसवणूक होत असल्याचे तरुणीच्या लक्षात आले. इंस्टाग्रामवर मैत्री करून तब्बल ६ लाख ४९ हजारांचा गंडा घातल्याप्रकरणी डॉ. मार्क नामक व्यक्ती विरोधात जळगाव सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक लीलाधर कानडे हे करीत आहेत.