नाशिक : स्मार्ट सिटीच्या 92 अंगणवाड्यांमधील चिमुकले उघड्यावरच गिरवताहेत धडे

नाशिक : स्मार्ट सिटीच्या 92 अंगणवाड्यांमधील चिमुकले उघड्यावरच गिरवताहेत धडे
Published on
Updated on

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
वेगाने विकसित होत असलेल्या नाशिक शहराची ओळख स्मार्ट सिटी म्हणून केली जात असली तरी याच स्मार्ट सिटीमधील महापालिकेच्या 419 पैकी 92 अंगणवाड्या उघड्यावर भरत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. चिमुकल्यांना बसण्यासाठी सुरक्षित जागा नसल्याने उघड्यावरच धडे गिरवावे लागत आहेत. बालकांना शिक्षणाची गोडी लागावी म्हणून विविध उपाययोजना केल्या जात असतात, तर दुसरीकडे बसायलाच जागा नाही तर या विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी कशी लागणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

समाजकल्याण विभागाचे उपआयुक्त डॉ. दिलीप मेनकर यांनी अंगणवाड्यांसाठी स्वत:ची इमारत असावी, यासाठी पुढाकार घेतला आहे. यासंदर्भात आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांना प्रस्ताव सादर केला जाणार आहे. मनपाच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत 419 अंगणवाड्या चालविल्या जातात. शहरातील गोरगरीब आणि सामान्य कुटुंबांतील मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अंगणवाड्या महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असून, खासगी शाळांच्या स्पर्धेत मनपाच्या शाळांमध्ये विविध उपक्रम राबविले जातात. परंतु, मनपा प्रशासनाचे गेल्या काही वर्षांत अंगणवाड्यांकडे दुर्लक्ष झालेले असल्याने त्यांची दुर्दशा झाली आहे. उपआयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर डॉ. मेनकर यांनी शहरातील काही अंगणवाड्यांना प्रत्यक्ष भेटी देत माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी अंगणवाडी सेविका तसेच समाजकल्याण विभागाच्या कर्मचार्‍यांना अंगणवाड्यांचे सर्वेक्षण करून अहवाल तयार करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार 419 पैकी तब्बल 92 अंगणवाड्यांना स्वत:च्या इमारतीच नसल्याचे समोर आले आहे. या अंगणवाड्या खासगी जागांमध्ये, मंदिराच्या आवारात, झाडाखाली भरत असल्याची बाब उघड झाली आहे. अंगणवाडी कर्मचार्‍यांना तुटपुंज्या मानधनातून खासगी जागेचे भाडे अदा करावे लागते.

विभागनिहाय इमारत नसलेल्या अंगणवाड्या
नाशिक पूर्व विभागात 16, नाशिक पश्चिम 8, पंचवटी 22, सातपूर 8, नाशिकरोड 20 तर सिडको विभागातील 15 अंगणवाड्यांना स्वत:ची इमारतच नाही. त्यामुळे प्राधान्याने या अंगणवाड्यांना स्वत:ची इमारत मिळवून देण्यासाठी उपआयुक्त डॉ. मेनकर यांनी प्रस्ताव तयार केला आहे. स्वत:ची इमारत असलेल्या 140 अंगणवाड्यांची अवस्थाही म्हणावी तशी चांगली नाही. त्यांची देखभाल दुरुस्ती करण्याची गरज आहे. बहुसंख्य अंगणवाड्यांमध्ये पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह यांसारख्या मूलभूत सुविधाही नाहीत. छत गळके तर काही अंगणवाड्यांचे तावदाने तुटलेले आहेत.

इमारती बांधणे तसेच देखभाल दुरुस्तीसाठी महिला बालकल्याण विभागाकडील चार कोटी आणि इतर विभागांकडील निधीद्वारे ही कामे जाऊ शकतात. त्यादृष्टीने आयुक्तांकडे प्रस्ताव सादर केला जाणार आहे. अंगणवाड्यांचे सर्वेक्षण आयुक्तांच्या मार्गदर्शनाखालीच करण्यात आले.
– डॉ. दिलीप मेनकर, उपआयुक्त, समाजकल्याण विभाग, मनपा

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news