दसरा मेळावा : शिंदे गटाची भुसे-कांदेंवर गर्दी जमविण्याची जबाबदारी | पुढारी

दसरा मेळावा : शिंदे गटाची भुसे-कांदेंवर गर्दी जमविण्याची जबाबदारी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुंबईतील बीकेसी मैदानावर होणार्‍या दसरा मेळाव्याला नाशिक शहर व जिल्ह्यातून सुमारे 18 हजार शिवसैनिक जाणार आहेत.

यासाठी शिंदे गटाने 337 बसेस आणि 424 खासगी वाहनांची व्यवस्था केली आहे. या सर्वच कार्यकर्त्यांच्या नाश्त्याची व्यवस्था घोटी टोलनाका परिसरात करण्यात आली आहे. तसेच मेळाव्यानंतर रात्रीच्या भोजनाचीही खास व्यवस्था करण्यात आली आहे. शिवसेनेचा (ठाकरे गट) दसरा मेळावा शिवाजी पार्क येथे होत आहे. या मेळाव्याला उत्तर देण्यासाठी शिंदे गटानेही पक्षाचा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर आयोजित केला आहे. शिवाजी पार्कच्या तुलनेत बीकेसी मैदान दुप्पट क्षमतेचे असल्याने तेवढी गर्दी जमविण्यासाठी शिंदे गटाने महिनाभर आधीपासूनच जय्यत तयारी केली आहे. दोन आठवड्यांपूर्वी नाशिकमध्ये शिंदे गटाची बैठक होऊन त्याद्वारे नियोजन करण्यात आले होते. मेळाव्याला तालुकानिहाय किती कार्यकर्त्यांना न्यायचे याची जबाबदारीच शिंदे गटाने विविध व्यक्तींवर सोपविली आहे.

नाशिकचे पालकमंत्रिपद शिंदे गटाला मिळाल्यामुळे शिवसेनेला टक्कर देण्यासाठी शिंदे गटाकडून प्रयत्न केले जात आहे. त्यामुळे पालकमंत्री दादा भुसेंवर मेळाव्याला जास्तीत जास्त गर्दी जमविण्याची मोठी जबाबदारी असणार आहे. त्यामुळे भुसे यांची एक प्रकारे तारेवरची कसरतच पाहायला मिळणार आहे. मालेगावमधून 50 बसेस, तर 125 टेम्पो ट्रॅव्हलर, तवेरासारख्या वाहनांची व्यवस्था केली आहेे. तसेच नांदगावचे आमदार सुहास कांदे यांच्यावर तब्बल 100 बसेसची जबाबदारी सोपवली आहे.

तालुकानिहाय असे आहे नियोजन (बसेस, चारचाकी)
नांदगाव – 100,मालेगाव – 50 – 125, नाशिक शहर – 32 – 09
नाशिक तालुका – 15 – 10,बागलाण – 30,येवला -चांदवड – 25
कळवण – 05 – 20, पेठ – 25, त्र्यंबकेश्वर – 20 – 30, इगतपुरी- 20 – 30, सिन्नर – 40, निफाड – 60, दिंडोरी – 60, सुरगाणा – 15.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मेळाव्याच्या माध्यमातून विचार ऐकण्यासाठी सर्वांचेच लक्ष लागून आहे. नाशिक शहर, जिल्ह्यातून 700 हून अधिक वाहनांद्वारे सुमारे 18 हजार कार्यकर्ते मेळाव्याला जातील. त्याची संपूर्ण तयारी झाली आहे.
– प्रवीण तिदमे, महानगरप्रमुख, शिंदे गट, शिवसेना

हेही वाचा :

Back to top button