शिरूर : शेतकर्‍यांचे ट्रॅक्टर चोरणारी टोळी गजाआड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश | पुढारी

शिरूर : शेतकर्‍यांचे ट्रॅक्टर चोरणारी टोळी गजाआड; स्थानिक गुन्हे शाखेचे यश

शिरूर; पुढारी वृत्तसेवा: पुणे जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेने शेतकर्‍यांचे ट्रॅक्टर चोरी करणारी टोळी जेरबंद केली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागरगाव (ता. शिरूर) येथील महेंद्र मुगुटराव शेलार यांनी घरासमोर लावलेला 3 लाख 40 हजार रुपये किमतीचा ट्रॅक्टर आणि ट्रॉली असा दि. 1 ऑगस्ट 2022 रोजी अज्ञाताने पळविला होता. याबाबत शिरूर पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली होती. या गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेऊन त्यांना तत्काळ अटक करण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक अभिनव देशमुख यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक शेळके यांना दिल्या होत्या.

या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा पथकामार्फत करीत असताना ही चोरी अजय जगन बेरड (रा. दरेवडी, अहमदनगर) याने त्याच्या इतर साथीदारांच्या मदतीने केल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दरेवडी अहमदनगर येथून त्यास ताब्यात घेऊन चौकशी केली. धीरज प्रमोद घोडके (रा. दरेवाडी, अहमदनगर), इरफान मुनीर पठाण (रा. सदर) आणि रवी रमेश बायकर (रा. पुंडी, ता. आष्टी, जि. बीड) यांच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली त्याने दिली.

त्यावरून पोलिसांनी धीरज प्रमोद घोडके व रवी रमेश बायाकर यांना देखील दरेवाडी अहमदनगर येथून सापळा रचून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून गुन्ह्यात चोरीस गेलेला ट्रॅक्टर व डम्पिंग ट्रॉली जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, अप्पर पोलिस अधीक्षक मित्तेश गट्टे, उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत गवारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अशोक शेळके, पोलीस उपनिरीक्षक गणेश जगदाळे, सहायक फौजदार तुषार पंधारे, पोलिस हवालदार जनार्दन शेळके, राजू मोमीन, पोलिस जवान दगडू विरकर यांनी केली.

Back to top button