नगर : महापालिका कर्मचार्‍यांची दिवाळी गोड; सहाव्या वेतन आयोगातील पहिला हप्ता मिळणार | पुढारी

नगर : महापालिका कर्मचार्‍यांची दिवाळी गोड; सहाव्या वेतन आयोगातील पहिला हप्ता मिळणार

नगर; पुढारी वृत्तसेवा: दिवाळीसाठी सानुग्रह अनुदान व थकीत देणे देण्याची कामगार युनियनची मागणी होती. त्यावर पदाधिकारी व प्रशासनाने चांगला निर्णय घेतला असून, मनपा कर्मचार्‍यांची दिवाळी गोड व्हावी त्यासाठी दहा हजार रुपये सानुग्रह अनुदान व सहाव्या वेतन आयोगाच्या फरकापोटी एक हप्ता दिवाळी अगोदर व दोन हाप्ते नोव्हेंबरमध्ये देण्याचा निर्णय झाला आहे, अशी माहिती महापौर रोहिणीताई शेंडगे यांनी दिली. मनपा कर्मचारी युनियनने दिवाळी सणासाठी सानुग्रह अनुदान, थकीत देण्यात यावे अशी मागणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर आज महापौर रोहिणीताई शेंडगे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.

यावेळी आयुक्त डॉ. पंकज जावळे, उपमहापौर गणेश भोसले, नगरसेवक श्याम नळकांडे, शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम, माजी विरोधीपक्ष नेते संजय शेंडगे, अतिरिक्त आयुक्त प्रदीप पठारे, मुख्यलेखाअधिकारी मोरे, आस्थापना विभाग प्रमुख अशोक साबळे, कामगार युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे, सरचिटणीस आनंद वायकर व युनियनचे पदाधिकारी उपस्थित होते. महापौर शेंगडे म्हणाल्या, मनपा कर्मचार्‍यांना दिवाळीच्या अगोदर पंधरा दिवस सानुग्रह अनुदान व सहाव्या वेतन आयोगाचा फरकापोटी एक हप्ता दिवाळी अगोदर देण्यात येईल. दोन हप्ते नोव्हेंबर महिन्यामध्ये देण्याबाबतचाही निर्णय झाला आहे.

कर्मचार्‍यांना दरवर्षीप्रमाणे दिवाळी आगाऊ रक्कम देखील मिळणार आहे. सर्व रक्कम दिवाळीच्या 15 दिवस आधी देण्याबाबत आदेश दिले आहेत. आयुक्त डॉ. पंकज जावळे म्हणाले, कामगार युनियन यांची बैठक घेतली. त्यामध्ये त्यांनी सानुग्रह अनुदान वीस हजार व सहाव्या वेतन आयोगाच्या फरकाचे तीन हप्ते मिळावे, अशी मागणी करण्यात आली होती. युनियनबरोबर बैठक घेऊन मनपाच्या आर्थिक परिस्थितीनुसार निर्णय घेण्यात येईल, असे सांगण्यात आले. परंतु, कामगार युनियनची मागणी व प्रशासनाची भूमिकेमध्ये महापौर व उपमहापौरांनी तोडगा काढला. मनपाची आर्थिक परिस्थिती पाहता अडव्हान्स, सानुग्रह अनुदान, सहाव्या वेतन आयोगाचा फरकाचा एक हप्ता देण्यात येईल. तसेच मानधनावरील कर्मचार्‍यांनाही काही रक्कम देण्यातबाबत कार्यवाही केली जाईल.

कर्मचार्‍यांना 20 हजार रूपये सानुग्रह अनुदान देण्याची मागणी केली होती. महापौर व उपमहापौरांनी योग्य निर्णय घेऊन दहा हजार रुपये सानुग्रह अनुदान ठरविले. त्याचबरोबर सहाव्या वेतन आयोगाचा एक हप्ता देण्याचे मान्य करून कर्मचार्‍यांसाठी चांगला निर्णय घेतला.
                                        – अनंत लोखंडे, आनंद वायकर, कर्मचारी युनियन

कर्मचारी युनियनची मागणी आणि प्रशासनाची भूमिका याच्यामध्ये आम्ही योग्यती मध्यस्ती केली. कर्मचारी युनियनने ती मान्य केली. त्यामुळे कर्मचार्‍यांना दिवाळी पूर्वी पगार, अडव्हान्स, सहाव्या वेतन आयोगाचा फरकाचा एक हप्ता असे मिळून दिवाळी गोड होणार आहे.
                                                         गणेश भोसले, उपमहापौर

 

Back to top button