नाशिक : पालकमंत्री दादा भुसे यांच्या बैठकीत उद्योजकांकडून तक्रारींचा पाऊस | पुढारी

नाशिक : पालकमंत्री दादा भुसे यांच्या बैठकीत उद्योजकांकडून तक्रारींचा पाऊस

नाशिक; पुढारी वृत्तसेवा : देशाच्या विकासात महत्वाचा घटक असलेल्या उद्योगांसाठीच्या वीज, पाणी, सांडपाणी व्यवस्थापन, रस्ते समस्या कायम आहेत. औद्योगीक क्षेत्रातील प्लॉट वाटपात मोठा भ्रष्टाचार असून अंबड – सातपूर मध्ये मोठ्या प्लॉटचे तुकडे पाडले जात असल्याने नाशिकमध्ये मोठा उद्योग उभा राहू शकला नाही, असा आरोप जिल्ह्यातील उद्योजकांनी पालकंमत्री दादा भुसे यांच्याकडे केली.

जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री भुसे यांनी उद्योजकांच्या संस्थांचे पदाधिकारी व संबंधित प्रमुख अधिकाऱ्यांशी संवाद साधताना त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी, यांच्यासह निमा, आयमा, सिन्नर, मालेगाव, अंबड एमआयडीसीचे पदाधिकारी, उद्योजक, औद्योगिक संस्थांचे पदाधिकारी उपस्थित हाेते. औद्योगीक क्षेत्रातील जुन्या बंद पडलेल्या कंपन्या मोठा गुंतवणूकदार विकत घेऊन त्याचे छोटे-छोटे प्लॉट पाडताे. हेच प्लॉटनंतर अन्य कंपन्यांसाठी विकत असल्याचा मूद्दा उद्योजकांनी बैठकीत मांडला. गाळेधारकांना प्लाॅट उपलब्ध होत नसतानाच पूर्वीच्या गाळेधारकांना मात्र, ते कसे ऊपलब्ध होतात, असा प्रश्न उपस्थित करताना प्लॉट वाटपात प्रचंड भ्रष्टाचार असल्याचा आरोप उद्योजकांनी केला. हे प्रकार थांबणे गरजेचे असून प्रत्येक तालुक्यात लॉजिस्टिक पार्क उभारण्याची मागणी उद्योजकांनी केली.

औद्योगीक क्षेत्रातील प्लॉट वितरणावेळी जिल्ह्यातील उद्योजकांना प्राधान्य देत जिल्ह्याच्या कृषी हब म्हणून प्रमोट करावे. कृषीप्रक्रीया उद्योगांना चालना देण्याची मागणी ऊद्याेजकांनी केली. अंबड-सातपूर मधील एसटीपी, कन्वेंन्शन सेेंटर, सिन्नरच्या माळेगाव एमआयडीसीतील रस्ते, महावितरण सबस्टेशन आदी समस्या कायम असल्याची व्यथा उपस्थितांनी भुसे यांच्यासमोर व्यक्त केली. यावेळी प्रदीप पेशकार, जगदीश होळकर, विक्रम सारडा, विलास गडकरी, गिविंद झा, सुधीर बडगुजर, राजेंद्र मानकर, धनंजय बेळे, निखिल पांचाळ यांच्यासह उद्योजक उपस्थित होते.

जिल्ह्यात अनेक उद्योग विकसित होत आहे. रोजगारनिर्मितीच्या दृष्टीने नवीन प्रकल्पांची निर्मिती करणे व जुने बंद असलेले उद्योग पुनर्जीवित करणे गरजेचे आहे. येत्या 15 दिवसात जिल्हाधिकारी, नाशिक मनपा आयुक्त, उद्योजक संस्थांचे पदाधिकारी व संबंधित अधिकारी यांची समिती स्थापन करून त्या माध्यमातून उद्योजकांचे प्रश्नांचे तातडीने निराकरण करावे.  -दादा भुसे, पालकंमत्री, नाशिक.

आ. खोसकरांना कानपिचक्या :

बैठकीत आमदार हिरामण खोसकर यांनी इगतपूरीमधील उद्योजकांच्या समस्या मांडल्या. त्यावेळी आमदार देवयानी फरांदे यांनी प्रथम आमच्या पालकमंत्र्यांचे आभार मानावे. त्यांनी तुम्हाला बैठकीला बोलवित भेदभाव केला नाही. मात्र, मागच्या पालकमंत्र्यांच्या काळात आम्हाला कधीच बोलवले गेले नाही, अशा शब्दांत फरांदेंनी खोसकरांना कानपिचक्या दिल्या.

उद्योजकांचे मुद्दे

-दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडोर दुसऱ्या टप्यात नाशिकच्या समावेश करावा

-अन्य राज्यांच्या तुलनेत राज्यात वीजदर जास्त.

-दिंडाेरी तालूक्यात औद्योगीक जागांचे दर कमी करावे.

-एमआयडीसीची ४० टक्के बांधकामाची अट शिथील करावी.

-अंबड एमआयडीसीती स्वतंत्र्य पोलीस ठाणे करावे

-ट्रक टर्मिनलची भूखंड करून दुसऱ्याला विकू नये.

-ॲग्रो टुरिझम वाढीसाठी प्रयत्न करावेत

-नाशिकला वाईन इन्स्टिट्यूट तयार करावे.

-जिल्ह्यासाठी परदेशी, मोठ्या उद्योगांची गुंतवणूक महत्त्वाची

-महावितरण लघु उद्योजकांकडून घेत असलेले दोन वर्षाचे अनामत रक्कम थांबवावी

हेही वाचा:

Back to top button