भंडारा जिल्ह्यात वाघाने घेतला दुसरा बळी | पुढारी

भंडारा जिल्ह्यात वाघाने घेतला दुसरा बळी

भंडारा: पुढारी वृत्तसेवा : आठवड्याभरापूर्वी मासेमारी करण्यासाठी गेलेल्या व्यक्तीला वाघाने ठार केल्याच्या घटना ताजी असतानाच पुन्हा त्याच वाघाने पिकांची पाहणी करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर हल्ला करुन ठार केले आहे. लाखांदूर तालुक्यातील कन्हाळगाव शिवारात घडलेल्या या घटनेमुळे मानव-वन्यजीव संघर्षाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

तेजराम बकाराम कार ( वय ४५, रा. कन्हाळगाव, ता. लाखांदूर) असे वाघाच्या हल्ल्यात मूत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. ही घटना आज शुक्रवारी (दि.३०) रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली आहे.

आठवडाभरापूर्वी लाखांदूर तालुक्यातील इंदोरा येथील जंगलात सीटी-१ या वाघाने मासेमारी करणाऱ्या व्यक्तीला ठार केलं होते. तर आज शुक्रवारी कन्हाळगाव येथील तेजराम कार हे गावातील मनोज प्रधान या शेतकऱ्यासोबत शेतात धान पिकाची पाहणी करण्यासाठी गेले होते. दरम्यान दबा धरुन बसलेल्या वाघाने अचानक तेजराम यांच्यावर हल्ला केला. यात तेजराम यांचा मृत्यू झाला.

आतापर्यंत सीटी-१ या वाघाने १३ जणांवर हल्ला करुन ठार केले. इंदोरा येथील घटनेनंतर वन विभागाने सदर वाघाला जेरबंद करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. परंतु, वाघाला पकडण्यात यश आले नाही. परिणामी आज पुन्हा एका शेतकऱ्याचा नाहक बळी गेला. या घटनेमुळे लाखांदूर तालुक्यात वाघाची दहशत अधिकच वाढली आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button