धुळे : न्यायासाठी शेतकऱ्यांचा ४५ किलोमीटर बैलगाडीसह पायपीट करीत मोर्चा | पुढारी

धुळे : न्यायासाठी शेतकऱ्यांचा ४५ किलोमीटर बैलगाडीसह पायपीट करीत मोर्चा

धुळे, पिंपळनेर : पुढारी वृत्तसेवा

साक्री तालुक्यातील पेसा क्षेत्रामधील डवण्यापाडा, हनुमंतपाडा, राईनपाडा, काकरपाडा, खळटी कुहेर, बागुल नगर, पुनाजी नगर, मोहकड, भोयाचापाडा, माळपाडा, सावरपाडा, मल्याचापाडा या गावांतील शेतक-यांच्या शेतजमिनी खोदून एका कंपनीची अहमदाबाद ते सोलापुर पर्यंतच्या कार्यक्षेत्रातील पाईपलाईन जात आहे. त्याविरोधात या गावांतील शेतकरी आक्रमक झाले असून या शेतक-यांनी तब्बल 45 किलोमीटर बैलगाडीसह पायपीट करत तहसीलदारांकडे आपली व्यथा मांडून मागण्यांचे निवेदन दिले.

आम्हा आदिवासी शेतकरी बांधवांवर अन्याय होत असल्याचे शेतक-यांनी म्हटले आहे. अनधिकृतरित्या ही पाईपलाईन टाकली जात असल्याचा या शेतक-यांचा आरोप आहे. शेतजमीन अधिग्रहण करत असताना जमिनीवरील विहीर, पाईपलाईन, झाडे, बोरवेल इत्यादींचे यथायोग्य मूल्यमापन झालेले नाही. जमिनीची प्रत जिराईत किंवा बागायत याचा देखील उल्लेख केलेला नाही. पेसा क्षेत्राची जमीन सोडून अन्य समाजातील लोकांच्या जमीन अधिग्रहण करीत असताना त्यांना प्रतिगुंठा जास्तीचा मोबदला देण्यात आलेला आहे. याविषयीची देखील चौकशी करण्यात यावी. समृद्धी महामार्गाच्या जमीन अधिग्रहणाच्या नियमाप्रमाणे आम्हाला भरपाई देण्यात यावी अशी मागणी या शेतक-यांनी तहसीलदारांकडे निवदेनाद्वारे केली आहे. यासाठी शेतक-यांनी सात दिवसांचा अल्टिमेटम दिला असून मागणी मान्य न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव घालू असा इशारा यावेळी शेतक-यांनी दिला.

या आंदोलनाचे नेतृत्व डॉ. विशाल वळवी, मोहन सूर्यवंशी, मा.खासदार बापूसाहेब चौरे, माजी आमदार डि. एस. अहिरे, विशाल पिंपळे, तानाजी बहिरम, छगन राऊत, विश्वास बागुल, शशिकांत शांताराम राऊत, कमलाकर साबळे,  सुनील चौधरी, प्रकाश बागुल, धर्मा ठाकरे, अभिमन ठाकरे, दयाराम ठेंगडे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष पंकज सूर्यवंशी, महारु चौरे, मनीराम अहिरे, प्रकाश बागुल, अशोक साबळे यांनी केले. यावेळी तालुक्यातील हजारो शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button