राज्यातील 40 महिषासुरांचा नायनाट कर; अंबादास दानवेंचे टेंभी नाक्यावरील देवीला साकडे | पुढारी

राज्यातील 40 महिषासुरांचा नायनाट कर; अंबादास दानवेंचे टेंभी नाक्यावरील देवीला साकडे

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : ठाण्यातून गद्दारांचे पीक आले असून, महाराष्ट्रात निर्माण झालेल्या सर्व महिषासुरांचा नायनाट कर, असे साकडे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी ठाण्यातील टेंभी नाक्यावरील महिषासुरमर्दिनीकडे घातले. यावेळी त्यांच्या सोबत शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे, शहर प्रमुख प्रदीप शिंदे यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते. यावेळी माध्यमांशी बोलताना दानवे यांनी शिवसेनेच्या बंडखोर 40 आमदारांना नाव न घेता त्यांना महिषासुर असे संबोधले.

शिवसेनेचा दसरा मेळावा हा न भूतो न भविष्यति असा होणार असल्याचा दावा करीत दानवे यांनी बारा आमदार नियुक्ती बाबत राज्यपालांनी आमच्यावर अन्याय केला असून तो आम्ही सहन करणार नाही. आमची यादी थांबवून ठेवणार्‍या राज्यपालांनी आठ दिवसात नवीन यादी बाहेर काढली, याबाबत न्यायालयाने योग्य निर्देश दिले आहेत, असे सांगितले.

रश्मी ठाकरे आज दर्शनाला येणार

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे ह्या गुरुवारी सायंकाळी टेंभी नाक्यावर देवीच्या दर्शनाला येणार आहेत. यावेळी होणार्‍या आरतीच्या वेळेवरून ठाकरे आणि शिंदे गटात वाद निर्माण झाला असून, वेळ बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहेत. मात्र रश्मी ठाकरे ठरलेल्या वेळेनुसार देवीचे दर्शन घेण्यासाठी येणार असल्याचे अंबादास दानवे यांनी स्पष्ट केले.

Back to top button