पुणे : फसवणूकप्रकरणी मुलीसह वडिलांवर गुन्हा

file photo
file photo

पुणे; पुढारी वृत्तसेवा: कौटुंबिक अडचणीसाठी उसने घेतलेले सात लाख रुपये परत न करता धनादेशावर मृत्यू पावलेल्या पतीच्या खोट्या सह्या करून फसवणूक केल्याप्रकरणी मुलीसह वडिलांवर कोथरूड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.  अदिती प्रवीण कुलकर्णी (वय 40) आणि विजय धामणकर (वय 65, दोघे रा. आनंदनगर, कोथरूड) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी गणेश शिंदे (वय 31, रा. शिवाजीनगर) यांनी कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हा प्रकार डिसेंबर 2018 ते ऑगस्ट 2019 दरम्यान घडला. शिंदे यांनी याबाबत न्यायालयात धाव घेतली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा वॉशिंगचा व्यवसाय आहे़. मित्राच्या कार्यालयात त्यांची अदिती कुलकर्णी यांच्याशी ओळख झाली. त्यांनी वैद्यकीय व कौटुंबिक अडचण असल्याचे फिर्यादींना सांगितले. त्यामुळे फिर्यादींनी स्वत:जवळचे पैसे व घरातील दागिने गहाण ठेवून व ओळखीतून काही पैसे जमवून अदिती कुलकर्णी यांना 7 लाख रुपये दिले. स्टँपपेपरवर उसणवार पावती लिहून घेतली.

कुलकर्णी यांना 2 महिन्यांच्या बोलीवर पैसे दिले होते. त्यानंतर अनेकदा पैशांची मागणी करूनही तिने पैसे परत केले नाही. त्याबाबत फिर्यादी यांनी कोथरूड पोलिस ठाण्यात तक्रार केली. दोघांत समझोता झाल्यानंतर 28 फेब्रुवारी 2019 रोजी त्यांनी 1 लाख रुपयांचा धनादेश दिला. दुसर्‍या चेकवर तिने व तिचे वडील विजय धामणकर यांनी अदितीचे मृत्यू पावलेले पती प्रवीण कुलकर्णी यांच्या खोटया सह्या करून फिर्यादींना चेक दिला. त्यामुळे ही रक्कम त्यांना मिळू शकली नाही. फिर्यादी यांनी न्यायालयात धाव घेऊन अर्ज केला. त्यानुसार न्यायालयाच्या आदेशानुसार कोथरूड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, सहायक पोलिस निरीक्षक चव्हाण तपास करीत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news