नाशिक : बिबट्याच्या कातडीची वनविभागातूनच चोरी? मु‌ख्य संशयित तस्कराच्या दाव्याने खळबळ | पुढारी

नाशिक : बिबट्याच्या कातडीची वनविभागातूनच चोरी? मु‌ख्य संशयित तस्कराच्या दाव्याने खळबळ

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

शहरातील बिबट्याच्या कातडीचे तस्करी प्रकरण दररोज नवनवीन वळण घेत आहे. वनकोठडीत असताना मुख्य संशयित तस्कराने बिबट्याची कातडी आपण वनविभागाच्या कार्यालयातून चोरल्याचा दावा केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. तर वरिष्ठ वनाधिकाऱ्यांनी चोरीचा दावा फेटाळून लावत संशयित तस्कराकडून दिशाभूल केली जात असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे तस्करांना बिबट्याची कातडी कुठे मिळाली? याबाबतचा सस्पेन्स कायम आहे.

गेल्या आठवड्यात नाशिकच्या वनपथकाने कॉलेजरोड भागातून बिबट्या कातडीच्या तस्करीसाठी आलेल्या तिघा तस्करांच्या मुसक्या आवळल्या होत्या. त्यांच्याकडून बिबट्याच्या जुनाट कातडीसह नीलगाय व चिंकाराची शिंगे हस्तगत करण्यात आली होते. संशयित सिद्धांत पाटील (२१, रा. सर्वेश्वर कॉलनी, ऑपोझिट वूडलॅण्ड, कॉलेजरोड) व रोहित आव्हाड (१९, रा. एमएचबी कॉलनी, सातपूर) यांना न्यायालयाने शुक्रवारी (दि.२४) न्यायालयीन कोठडी, तर मुख्य सूत्रधार असलेल्या वनकर्मचाऱ्याचा मुलगा संशयित जॉन सुनील लोखंडे (२९, रा. वनवसाहत कॉलनी, त्र्यंबक रोड) याला न्यायालयीन कोठडी सुनावली होती.

वनकोठडीत असताना तिघांची सखोल चौकशी करण्यात आली होती. मुख्य संशयित लोखंडे याने चौकशीत सदरची बिबट्याची कातडी जुने नाशिक वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालयाच्या परिसरात असलेल्या भंगारातून चोरी केल्याचा दावा केला होता. वनाधिकाऱ्यांनी कारवाईत जप्त केलेल्या आणि रेकॉर्ड रूममध्ये ठेवलेल्या सर्व वन्यजीवांच्या अवयव, कातड्यांची पाहणी केली असता ते जैसे थे आढळून आले. तसेच बिबट्याच्या कातडीसह इतर वन्यजीवांचे अवयव चोरी अथवा गहाळ झाल्याची नोंद नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे चोरीचे गूढ कायम आहे.

लोखंडेचा जामीन फेटाळला

चोरीच्या बिबट्याची कातडी तस्करी प्रकरणातील सिद्धांत पाटील व रोहित आव्हाड यांचा जामीन मिळण्याचा अर्ज दोन दिवसांपूर्वी जिल्हा न्यायालयाने अर्ज नामंजूर केला. त्यापाठोपाठ बुधवारी (दि.२८) मुख्य सूत्रधार संशयित जॉन लोखंडे याचा अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे तिघाही तस्करांचा कारागृहातील मुक्काम वाढला आहे.

हेही वाचा :

Back to top button