करंजीच्या ‘त्या’ दुकानाचा परवाना रद्द | पुढारी

करंजीच्या ‘त्या’ दुकानाचा परवाना रद्द

करंजी : पुढारी वृत्तसेवा : विषबाधेस कारणीभूत ठरल्याप्रकरणी भगरीचे पीठ विकणार्‍या करंजीतील नीलेश सुभाष साखरे यांच्या हरिओम किराणा दुकानाचा परवाना अन्न व औषध प्रशासनाने रद्द केला आहे. पाथर्डी तालुक्यातील करंजी व व खंडोबावाडीतील ग्रामस्थांना भगरीच्या पिठाच्या भाकरी खाल्ल्यानंतर विषबाधेची घटना सोमवारी (दि. 26) घडली होती. या प्रकरणाची गंभीर दखल अन्न व औषध प्रशासनाने घेतली.

करंजीत किराणा व्यवसायात दबदबा असलेल्या हरिओम किराणा दुकानाचा परवाना रद्द केला. तसेच विकलेले भगरीचे पीठ व भगर परत मागवून घेत त्याचा अहवाल अन्न व प्रशासन कार्यालयास सादर करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी प्र. बा. कुटे, रा. ना. बडे, उ. रा. सूर्यवंशी यांनी सहाय्यक आयुक्त सं. पा. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली केली.

 

Back to top button