दुसरा हप्ता दिवाळीपूर्वी देणार ; ‘कुकडी’चे अध्यक्ष राहुल जगताप | पुढारी

दुसरा हप्ता दिवाळीपूर्वी देणार ; ‘कुकडी’चे अध्यक्ष राहुल जगताप

श्रीगोंदा : पुढारी वृत्तसेवा : कर्मयोगी कुंडलिकराव जगताप कुकडी सहकारी साखर कारखान्याचा कारभार काटकसरीने चालू आहे. कारखान्याची एफआरपी 2 हजार 160 रुपये आहे. पहिला हप्ता 2 हजार 250 रुपये दिला आहे. दिवाळीपूर्वी दुसरा हप्ता आणि कामगारांना बोनस देणार अशी ग्वाही कारखान्याचे अध्यक्ष राहुल जगताप यांनी दिली. पिंपळगाव पिसा येथे बुधवारी कारखान्याची 25 वी सर्वसाधारण सभा अध्यक्ष जगताप यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी ते बोलत होते.

माजी आ. जगताप म्हणाले की, कुंडलिक तात्यांच्या निधनानंतर कुकडी कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी आमदार बबनराव पाचपुते, राजेंद्र नागवडे, घन:श्याम शेलार, दिनकर पंधरकर यांनी मोलाची मदत केली. मी त्यांचा आभारी आहे. कुकडी कारखाना सांडपाण्यावर नियंत्रणासाठी पावले उचलणार आहे. शेतकी विभागाबाबत तक्रार आल्यास तत्काळ कारवाई केली जाईल. लमानबाबा डोंगरावर कारखान्याचे संस्थापक कुंडलिकराव जगताप यांचा पुतळा उभारण्यात येणार असल्याचे जगताप यांनी सांगितले.
राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस घन:श्याम शेलार म्हणाले, ऊस लागवडीची नोंद घेऊन ऊसतोडणी व्यवस्थित करणे गरजेचे आहे. त्यातच कारखान्याचा फायदा आहे. काही कर्मचारी आपणच मालक आहोत, असे वागतात. त्यांना जमिनीवर आणण्याची गरज आहे.

दिनकर पंधरकर म्हणाले, कामगार व इतरांची देणी 92 कोटींवर गेली आहेत. समारंभ खर्च कोरोनात वाढला आहे. ऊस उत्पादकांना जास्तीत जास्त भाव कसा देता येईल, याकडे लक्ष द्यावे. यावेळी सुरेश लोखंडे, प्रमोद इथापे, भास्कर कदम, बंडू पंधरकर, सुभाष काळोखे, विश्वास थोरात, तानाजी बोरुडे, अ‍ॅड. बाळासाहेब पवार, दादा भापकर, सोमनाथ खेडेकर, गणेश बेरड, भाऊ कदम यांची भाषणे झाली. खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष संभाजी घुटे, सुरेश सुडगे, संजय आनंदकर, बिभीषण उगले, शरद गलांडे, धोंडीबा लगड, अंकुश रोडे, नितीन डुबल, संजय नलगे, श्रीपाद कवाष्टे यांच्यासह शेतकरी, सभासद, ऊस उत्पादक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रास्ताविक उपाध्यक्ष विवेक पवार यांनी केले. सूत्रसंचलन नारायण शिंदे यांनी, आभार बाळासाहेब उगले यांनी मानले. मागील वर्षाचा अहवाल वाचन करताना कार्यकारी संचालक दत्तात्रय मरकड यांनी कारखान्याच्या ध्येयधोरणांचा लेखाजोखा सभासदांसमोर मांडला.

उगाच दिशाभूल करू नका
कारखान्या संदर्भात सूचना अगर आरोप करणार्‍यांचा मी नेहमी आदर करतो. पण काही जण उगीच आवाज वाढवतात. खोटे बोलून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नका, कारखान्याचे सभासद हुशार आहेत, असा टोला जगताप यांनी लगावला.

Back to top button