नाशिक : अमली पदार्थ विक्रेते अन् नशेखोरांवर बहिष्कारास्त्र | पुढारी

नाशिक : अमली पदार्थ विक्रेते अन् नशेखोरांवर बहिष्कारास्त्र

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा
समाज व्यसनमुक्त करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने सजग होण्याची गरज आहे. जे लोक अमली पदार्थ विक्री करतात, त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार टाकणे हा सर्वोत्तम पर्याय आहे. कुराण व हदीसमधून आपल्याला याबाबत मार्गदर्शन मिळते. या लोकचळवळीत सहभागी होऊन मालेगावला व्यसनमुक्त करू या, अशी साद सुन्नी दावत – ए – इस्लामचे प्रमुख मौलाना सय्यद अमीनूल कादरी यांनी घातली.

येथील एटीटी हायस्कूलच्या मैदानावर शुक्रवारी (दि. 23) रात्री 15 हून अधिक सामाजिक व धार्मिक संघटनांच्या पुढाकारातून जनजागृतीपर ही सभा पार पडली. त्यावेळी मौलानांनी व्यसनाधिनतेवर आसूड ओढला. सभेला पोलिस उपअधीक्षक प्रदीप जाधव, पोलिस निरीक्षक सुरेशकुमार घुसर, अशोक रत्नपारखी, बाळासाहेब थोरात, प्रकाश काळे यांसह विविध पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी व संघटनांचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. मौलाना म्हणाले की, अमली पदार्थांचे व्यसन हे समाजासाठी विनाशकारी आहे. तरुणांबरोबरच शालेय विद्यार्थीही व्यसनाच्या आहारी जात आहेत. सध्याची चिंताजनक परिस्थिती लक्षात घेता, अमली पदार्थांच्या विक्रीविरोधात मोहीम राबवून, लोकांमध्ये जनजागृती करणे ही काळाची गरज आहे. प्रत्येक परिचिताला व्यसनापासून परावृत्त करावे. जेणेकरून व्यक्ती, कुटुंब आणि समाजाला उद्ध्वस्त होण्यापासून वाचविता येईल. राजकीय नेत्यांनीदेखील आपली समाजाप्रतिची जबाबदारी निभवण्याची वेळ आली असल्याकडेही मौलानांनी लक्ष वेधले. मौलाना यांनी प्रशासनालाही उद्देशून सांगितले की, नशेखोरीमुळे शहरात गुन्हेगारी, अपघात आणि आत्महत्येचे प्रमाण वाढत आहे. सुव्यवस्था निर्माण करण्यासाठी अमली पदार्थांची आयात व विक्री करणार्‍यांवर पोलिसांनी कठोर कारवाई करावी, नागरिकांनीही प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. सभेला हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता. प्रार्थनेने सभेची सांगता झाली.

नशामुक्तीसाठी लोकसहभाग अत्यंत आवश्यक आहे. नशेखोरी समाजासाठी घातक आहे, तेव्हा नशेची औषधी, गोळ्या आदी विक्री करणार्‍यांची माहिती पोलिसांना द्यावी. व्यसनाधीन आणि त्यांना वाममार्गाला लावणार्‍यांवर सामाजिक बहिष्कार टाकावा, त्यांच्या अंत्ययात्रेलाही जाऊ नये. कोणत्याही पद्धतीने अशा लोकांशी संबंध ठेवू नये, त्यांना मदत करणेही पाप ठरेल. – मौलाना सय्यद अमीनूल कादरी, प्रमुख, सुन्नी दावत-ए-इस्लाम.

हेही वाचा:

मालेगाव : येथील एटीटी हायस्कूलमध्ये सुन्नी दावत-ए-इस्लामतर्फे आयोजित व्यसनमुक्ती अभियानाप्रसंगी जनसमुदायाला मार्गदर्शन करताना मौलाना सय्यद अमीनूल कादरी.

Back to top button