केडगाव : कामगार-कारखाना ही एकाच गाडीची दोन चाके: अशोक पवार यांचे प्रतिपादन | पुढारी

केडगाव : कामगार-कारखाना ही एकाच गाडीची दोन चाके: अशोक पवार यांचे प्रतिपादन

केडगाव; पुढारी वृत्तसेवा: कामगार आणि साखर कारखाना ही एकाच गाडीची दोन चाके असून, त्यांनी आपापसांत जमवून घेणे गरजेचेच आहे. थोडीशीही बेपर्वाई केली, की परिणाम या दोघांसह त्या परिसरातील उद्योग व्यवसाय व नागरी जीवनाला भोगावे लागतात, असे प्रतिपादन नेवासा तालुका राष्ट्रीय कामगार संघाचे अध्यक्ष अशोक पवार यांनी केले.

अनुराज शुगर्सचे संस्थापक स्वर्गीय राजाराम बोरकर यांच्या 10व्या स्मृतिदिनानिमित्त कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक आणि माजी आमदार रमेश थोरात, साखर कामगार फेडरेशनचे खजिनदार डी. एम. निमसे, बाळासाहेब डोहाळे, सुखदेव फुलारी, संभाजीराव माळवदे आदी साखर कामगार संघटनेचे पदाधिकारी, डॉ. कटारिया, डॉ. वसगावकर, डॉ. माने आदींसह शेतकरी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. पवार म्हणाले की, राजाराम बोरकर यांनी कष्ट, जिद्द व चिकाटीने साखर व्यवसायात आपले नाव कमविले.

‘अनुराज’ त्यांच्या श्रमाची साक्ष म्हणता येईल
कामगार आणि कारखाना यांनी कायम एकसंध राहावे. कारखान्याच्या चिमणीतून धूर जोपर्यंत निघत असतो तोपर्यंत कामगारांचीसुद्धा चूल पेटलेली असते. दोन्ही घटक प्रामाणिकपणे कार्यरत राहिल्यास त्यांच्या कारभाराने कारखानदारी सुधारते. आर्थिक सुबत्ता वाढते. यात दोघांचाच फायदा होत नाही. त्यापुढे जाऊन परिसरातील व्यापार, किरकोळ व्यावसायिक आणि शेतकर्‍यांबरोबर परिसरातील जनजीवनसुद्धा उंचावते, असे सांगून कारखाना आणि कामगार यांच्यातील सामोपचार काय घडवते, याची माहिती देऊन त्यांनी स्वर्गीय बोरकर यांना आदरांजली वाहिली.

या प्रसंगी रमेश थोरात म्हणाले की, स्वर्गीय राजाराम बोरकर यांनी उभारलेल्या या कारखानदारीला टिकविण्यासाठी सर्वांनी प्रामाणिक मदत केली पाहिजे. त्यांनी अतिशय मेहनतीने व प्रामाणिकपणे कारखाना उभारला आहे. त्यांच्या कार्यप्रणालीची ओळख अनेक साखर कारखान्यांना माहीत आहे.

कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. माणिक बोरकर म्हणाले की, माझ्या स्वर्गीय वडिलांनी नोकरी करीत आमचा परिवार सांभाळला. मुले-मुली उच्चशिक्षित केली. त्यांच्या हयातीत साखर कारखाना उभारण्याचे स्वप्न त्यांनी पूर्ण केले आहे. त्यासाठी परिसरातील शेतकरी, कामगार, ऊस वाहतूकदार यांनी आजपर्यंत प्रामाणिकपणे सहकार्य केले आहे. पुढील काळात ते करतील, यात शंका नाही. प्रारंभी कारखानास्थळावर असलेल्या स्वर्गीय बोरकर यांच्या अर्धपुतळ्याचे पूजन मान्यवरांच्या हस्ते केले गेले.

Back to top button