बारामती : सहकारी संस्थांकडून इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन: विरोधी पक्षनेते अजित पवार | पुढारी

बारामती : सहकारी संस्थांकडून इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन: विरोधी पक्षनेते अजित पवार

बारामती; पुढारी वृत्तसेवा: सहकारी दूध संघ, खरेदी-विक्री संघ, बाजार समितीच्या माध्यमातून पेट्रोल पंप, सीएनजी पंप सुरू करून उत्पन्नाचे नवे मार्ग शोधण्यात आले. यापुढील काळ इलेक्ट्रिक वाहनांचा आहे. त्यामुळे या संस्थांच्या माध्यमातून लवकरच इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन्स सुरू करण्यात येणार असल्याची माहिती विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली. बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 19 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. याप्रसंगी माळेगावचे अध्यक्ष बाळासाहेब तावरे, बारामती बँकेचे अध्यक्ष सचिन सातव, सोमेश्वरचे माजी अध्यक्ष राजवर्धन शिंदे, दूध संघाचे अध्यक्ष संदीप जगताप, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, विश्वास देवकाते आदी उपस्थित होते.

पवार म्हणाले, राज्यातील 305 बाजार समित्यांमध्ये बारामती समितीने नववा, तर पश्चिम महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला आहे. पुढील काळात राज्यात क्रमांक एकची समिती असा नावलौकिक निर्माण केला जाईल. समित्यांसाठी काही जाचक कायदे केले गेले. खासगी समित्यांना परवानगीचा निर्णय घेतला जात होता, परंतु, दिल्लीत शेतकर्‍यांनी आंदोलन केल्यानंतर कृषी कायदे मागे घेतले गेले. राज्य शासनाने शेतकर्‍यांना आता मतदानाचा अधिकार दिला आहे. बारामती समितीची निवडणूक 29 जानेवारीला होणार नाही.

मागील पाच वर्षांत विविध खासदारांकडून समितीसाठी मोठा निधी आणला. राज्य सरकारचा निधी मिळवला. जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून अनेक कामे झाली. 42 कोटी रुपये शंभर कोटी अनुदानातून मिळाले. समितीच्या इतिहासात एवढी रक्कम मिळाली नव्हती. त्यातून निर्यात केंद्रासह अन्य कामे सुरू आहेत. झारगडवाडीत जनावरांच्या बाजारासाठी 26 एकर जागा घेत आहोत. सुप्यात 17 एकर जागा घेतली आहे. उंडवडीत पंपासाठी कराराने जागा घेतली आहे. मागील संचालक मंडळाच्या काळात 65 कोटींचा निधी समितीला आला आहे. आता मी अर्थमंत्री नसलो तरी बारामतीच्या विकासावर त्याचा काही फरक पडणार नाही, असे त्यांनी सांगितले.

समितीकडून ऑक्टोबरपासून कापसाचे उघड लिलाव सुरू केले जाणार आहेत. इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशनसाठी कंपन्यांकडे प्रस्ताव पाठवले असून त्यातून उत्पन्नाचे नवे साधन निर्माण होणार आहे. प्रशासक मिलिंद टांकसाळे यांनी प्रास्ताविक केले. सचिव अरविंद जगताप यांनी विषयपत्रिकेचे वाचन केले. अनिल सावळे पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

रयत भवन होणार इतिहासजमा
बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील रयत भवन हे मंगल कार्यालय लवकरच इतिहासजमा होणार आहे. शहर व परिसरात मंगल कार्यालये मोठ्या प्रमाणात झाली आहेत. त्यामुळे ही इमारत पाडून तेथे सात मजली व्यावसायिक इमारत उभी केली जाणार आहे. त्यातून अनेकांना गाळे, कार्यालये उपलब्ध होतील. समितीला मोठे उत्पन्न मिळेल, असे अजित पवार यांनी सांगितले.

Back to top button