उद्धव यांच्या चुकीमुळेच ‘वेदांता’ गुजरातला, गिरीश महाजन यांचा आरोप | पुढारी

उद्धव यांच्या चुकीमुळेच ‘वेदांता’ गुजरातला, गिरीश महाजन यांचा आरोप

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मंत्रालयाची पायरी चढले नाहीत. घराबाहेरही पडले नाहीत. जानेवारीमध्ये पत्र देऊनही मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली नाही. त्यांच्या चुकीमुळेच वेदांता प्रकल्प गुजरातला गेल्याचा आरोप राज्याचे ग्रामविकास पंचायतराज, वैद्यकीय शिक्षण व क्रीडामंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला. पंचायती राज मंत्रालय भारत सरकार ग्रामविकास व पंचायत राज विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने पिंपरी-चिंचवड येथे आयोजित स्वच्छ व हरित ग्राम जलसमृद्ध गाव या विषयावरील राष्ट्रीय कार्यशाळेचे उद्घाटन गिरीश महाजन यांच्या हस्ते झाले. यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी केंद्रीय मंत्री कपिल पाटील हेही उपस्थित होते.

यावेळी महाजन यांना वेदांता प्रकल्पासंदर्भात प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, गुजरातला गुंतवणूक गेली असली तरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे की, येत्या अडीच वर्षात गुजरातपेक्षा अधिक गुंतवणूक आणण्याचा प्रयत्न करू. त्यामुळे हा वेदांता प्रकल्प कोणामुळे गुजरातला गेला याची चर्चा बाजूला ठेवली पाहिजे.

दसरा मेळावा शिवाजी पार्क येथे न घेता उद्धव ठाकरे यांनी इतरत्र मेळावा घ्यावा, अशी सूचना त्यांनी केली. आता निवडणुका घेतल्यास शिवसेनेला चांगले यश मिळेल, निवडणुका घेऊन दाखवा, या उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या आव्हानाबद्दल विचारले असता महाजन म्हणाले की, जे शक्य नाही ते उद्धव ठाकरे बोलत आहेत. आत्याबाईला मिशा असत्या तर… असा हा प्रकार आहे. त्यांची शेवटची धडपड सुरू आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेचे अस्तित्व कळाले शेवटच्या नंबरवर शिवसेना आली आहे. आता तरी उद्धव ठाकरे यांनी संयम ठेवावा अशी सूचना महाजन यांनी केली.

जनावरांमध्ये आढळत असलेल्या लम्पी स्कीन आजाराबाबत विचारले असता महाजन म्हणाले की, वॉर्डस्तरावर जनावरांचे लसीकरण करण्यात येत आहे. जेथे जनावरांना अशा आजाराची लागण दिसून येत आहे, तेथील पाच किलोमीटर क्षेत्रावर संपूर्ण लसीकरणाचे आदेश देण्यात आले आहेत. जेथे या रोगाचा प्रादुर्भाव जास्त असेल तेथे बैलपोळा न करणे अधिक योग्य राहील, असे ते म्हणाले. जलसमृद्ध गाव सिंचन घोटाळे याबाबत विचारले असता महाजन म्हणाले की, मागील सरकारने चौकशी केली, मात्र क्लीनचीट मिळाली. जलशयुक्त शिवारमुळे बागायत क्षेत्रात वाढ झाली. साखळी बंधारे याबाबत अधिक चांगले परिणाम मिळाले असे ते म्हणाले.

गायरानांवरील अतिक्रमणाबाबत विचारले असता ते म्हणाले की, गायरान हा गावाचा आत्मा आहे. तो टिकवणे गरजेचे आहे. शिल्लक गायराने आता सुरक्षित कसे राहतील हे पाहण्यासाठी सरकार प्रयत्न करेल. एकनाथ खडसे यांचा जळगावात करिष्मा राहिला आहे, असे आपल्याला वाटत नसल्याचे त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

‘राजकीय व्यवस्थेनुसार निर्णय’
पालघर येथील शिंदे गटातील आमदार भाजपमध्ये सामील झाल्याबद्दल विचारले असता केंद्रीय मंत्री कपिल पाटील म्हणाले की, दहीसरचे भाजप नेते शिंदे गटात सामील झाले राजकीय व्यवस्था सूट होत नाही तेव्हा असे निर्णय घेतले जातात.

‘ते पैसे राज्यांनी दहा दिवसांत ग्रामपंचायतींना द्यावेत’
पंचायतींना दिल्या जाणार्‍या निधीवर डल्ला मारला जातो. त्यावर सरकार काय करणार असे विचारले असता पाटील म्हणाले की, फायनान्स कमिशनचा पैसा राज्य सरकार मार्फत थेट पंचायतींना दिला जातो. राज्यांनी हा पैसा दहा दिवसात ग्रामपंचायतींना द्यावा अन्यथा वेळ लावल्यास व्याजासह तो द्यावा असे आदेश केंद्राने दिले आहेत, असे त्यांनी सांगितले.

 

Back to top button