

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महापालिकेतील काही संधीसाधूंनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त संधी साधत महापालिकेवर केलेल्या विद्युत रोषणाईतही आपले हात धुवून घेतले. मनपाच्या राजीव गांधी भवनावर करण्यात आलेल्या विद्युत रोषणाईपोटी 14 लाख 10 हजार रुपये इतके बिल आकारण्यात आले असून, याबाबतचा प्रस्ताव मंगळवारी (दि.20) स्थायी समितीकडे सादर झाला. त्यावर आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनीही आश्चर्य व्यक्त करत निविदा दर मंजुरीविषयी त्यांनी माहिती मागविली आहे.
महापालिकेत काही अधिकारी आणि त्यांच्या भोवती घिरट्या घालणारे ठेकेदार हे समीकरण नवे नाही. अधिकारी आणि ठेकेदार तसेच त्यांच्या जोडीला काही लोकप्रतिनिधी एकमेकांशी संगनमत करून विकासकामे आणि योजनांमध्ये आपापले खिसे गरम करत असतात. घंटागाडी, रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, उड्डाणपूल, औषधे व साहित्य खरेदी, पेस्ट कंट्रोल, शालेय पोषण आहार, श्वान निर्बीजीकरण अशा अनेक योजना तसेच कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक व्यवहार होतात. वेळप्रसंगी ठेकेदारासाठी पूरक अशा अटी-शर्ती तयार करून निविदा प्रक्रियेतही बदल केले जातात. त्याचे ताजे उदाहरण म्हणजे हायड्रोलिक शिडी आणि यांत्रिकी झाडू खरेदीची प्रक्रिया होय. मनपातील अधिकारी आणि कर्मचार्यांच्या बदल्या तसेच पदोन्नतीतही काही अधिकारी आपले इप्सित साध्य करत असतात. गेल्या मार्च महिन्यात पंचवार्षिक मुदत संपुष्टात आल्याने सध्या प्रशासकीय राजवटीखाली कारभार सुरू आहे. त्यामुळे या राजवटीत काही अधिकार्यांना लोकप्रतिनिधींचा दबाव नसल्याने मोकळे रानच मिळाले आहे. प्रशासकीय राजवटीत खरे तर गैरकारभाराला लगाम लागणे अपेक्षित असते. परंतु, इथे मात्र उलटाच कारभार सुरू आहे.
निविदा प्रक्रियेची मागविली माहिती
नऊ दिवसांसाठी महापालिकेवर करण्यात आलेल्या विद्युत रोषणाईसाठी 14 लाख 10 हजार रुपये खर्चाचा प्रस्ताव मंगळवारी (दि.20) कार्योत्तर मंजुरीकरता स्थायी समितीवर सादर करण्यात आला होता. हा विजेचा खर्च पाहून आयुक्त तथा प्रशासक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांना शॉकच बसला. विद्युत रोषणाईवर एवढा खर्च कसा असा प्रश्न करत निविदा प्रक्रिया राबविली का, अशी विचारणा केली असता वार्षिक निविदा दर मंजूर असल्याचे विद्युत विभागाचे अधीक्षक अभियंता उदय धर्माधिकारी यांनी स्पष्ट केले. दरम्यान, यासंदर्भात निविदा प्रक्रियेची माहिती सादर करण्याचे निर्देश आयुक्तांनी अधिकार्यांना दिले आहेत.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मनपा मुख्यालय राजीव गांधी भवनावर 9 ते 17 ऑगस्ट या नऊ दिवसांसाठी विद्युत रोषणाई करण्यात आली होती. या नऊ दिवसांसाठी केलेल्या रोषणाईवर 14 लाख 10 हजार रुपयांचा खर्च संशय निर्माण करणारा आहे. मे. भद्रकाली एन्टरप्रायझेस, नाशिक यांच्या माध्यमातून हे काम करण्यात आले होते.