राशीनला दीड लाखाचा ऐवज लंपास | पुढारी

राशीनला दीड लाखाचा ऐवज लंपास

राशीन : पुढारी वृत्तसेवा  : कर्जत तालुक्यातील राशीन येथे पोलिस दूरक्षेत्रापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या साळवे कॉलनीमध्ये घरफोडी झाली आहे. प्राथमिक शाळेचे शिक्षक सतीश आनंदराव मुळे यांच्या घरातून चोरट्यांनी दीड लाखाचा ऐवज लंपास केला आहे. याबाबत कर्जत पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सतीश मुळे हे आई आजारी असल्याने त्यांच्या मूळ गावी उजनी (जि. लातूर) येथे गेले होते. गावाहून 18 सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजता राशीन येथे परत आले. त्यांनी घरमालक भारत जालिंदर शेरे यांना चावीसाठी फोन केला असता, ते पण त्यांच्या गावी कोर्टी (जि. सोलापूर) येथे गेल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी चाव्या शेजारी ठेवल्या असल्याचेे कळविले.

त्यानंतर मुळे हे चाव्या घेऊन घर उघडण्यासाठी आले असता, त्यांना दरवाजाचा कोयंडा तुटलेला दिसला. त्यांनी तात्काळ घरमालक भारत शेरे यांना दरवाजाचा कोयंडा तुटलेला आहे, तुम्ही लवकर घरी या, असे कळविले. थोड्या वेळात भारत शेरे घरी आल्यानंतर त्यांनी घरात जाऊन पाहिले असता, घरातील कपाटाचे दार उघडे व सामानाची उचकापाचक केल्याचे दिसले.  घरात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. सोन्याचे दोन गंठण, कानातील वेल, फुले, सोन्याची अंगठी, चांदीचे फुलपात्र, वाटी, पंचपाळ असा ऐवज चोरट्यांनी चोरून नेल्याचे समजले. घरमालक शेरे यांच्या घरातूनही सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरट्यांनी चोरून नेले.

ठसे तज्ज्ञांची टीमही दाखल
राशीन पोलिस दूरक्षेत्राच्या जवळच घरफोडी झाल्याने चोरट्यांनी पोलिसांना एक प्रकारे आव्हानच दिले आहे. दरम्यान, घटनास्थळी पोलिस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव व कर्जतचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी ठसे तज्ज्ञांची टीमही दाखल झाली होती.

Back to top button