जवळा : अतिपावसाने ओल्या दुष्काळाची स्थिती; पावसाच्या पाण्याने जमिनी उपळल्या | पुढारी

जवळा : अतिपावसाने ओल्या दुष्काळाची स्थिती; पावसाच्या पाण्याने जमिनी उपळल्या

जवळा; पुढारी वृत्तसेवा: पारनेर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील कुकडी कालवा भागात अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने व त्यात कुकडी कालवाही दुथडी भरून वाहत असल्याने जमिनी उपळल्या आहेत. जमिनीत पाणी साचून राहत असल्याने पिके सडू लागली आहेत. त्यामुळे प्रशासनाने कुकडी पट्ट्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी माजी पंचायत समिती सदस्य व उपसरपंच किसनराव रासकर यांनी केली आहे

अतिपवासाने ओला दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेले पिकांचे घास संततधार पाऊस हिरावून घेत आहे. कुकडी कालवा परिसर हा कांदा पिकाचे आगार समजला जातो. येथील सुमारे 80 टक्के क्षेत्रावर कांदा पिकाची हजारो एकरांत लागवड होते. या भागातील शेतकर्‍यांचे वर्षभराचे अर्थकारण हे कांदा पिकावरच अवलंबून असते. परंतु, यंदा अतिपावसाने कांदा पीक अडचणीत आले असल्याचे शेतकर्‍यांना जाणवू लागले आहे. यंदाचे अर्थकारण कोलमडून शेतकरी मेटाकुटीला येऊ लागला आहे.

जुन्या साठविलेल्या कांद्याला बाजारभावाने मारले तर आहेच. तर दुसरीकडे तो ढगाळ हवामानामुळे काजळी पकडून काळा पडू लागला आहे. पावसाने तोही सडणार अन् नवीन कांदा लागवडीसाठी टाकलेल्या रोपांना अति पावसाने झोडपल्याने रोपे जाण्याची भीती निर्माण झाली आहे. ऊस, बाजरी, सोयाबीन, मिरची, वांगी, फ्लॉवर, तरकारी पिके पिकेही पाण्यात बुडून गेले आहेत

सगळीकडून अस्मानी व बिकट परिस्थितीत घेरलेल्या शेतकर्‍यांना सावरण्यासाठी प्रशासनाने पावले उचलण्याची गरज आहे. सरकारने जाहीर केलेले 50 हजारांचे अनुदान लवकरात लवकर शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करावे व या भागात ओला दुष्काळ जाहीर करून नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी होत आहे. यावेळी माजी सरपंच शिवाजीराव सालके, ग्रामपंचायत सदस्य कानिफ पठारे, उपसरपंच गोरख पठारे, सेवा संस्थेचे अध्यक्ष संतोष पठारे, प्रदीप सोमवंशी, शेखर सोमवंशी, मंगेश सालके, कैलास शेळके, अरुण सालके, भाऊ पठारे आदी उपस्थित होते.

 

Back to top button