Nashik : मनमाडला मुसळधार पावसाचा धुमाकूळ, नद्यांना रौद्ररूप | पुढारी

Nashik : मनमाडला मुसळधार पावसाचा धुमाकूळ, नद्यांना रौद्ररूप

नाशिक, मनमाड : पुढारी वृत्तसेवा

शहर, परिसरात मुसळधार पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला असून, रविवारी (दि. 18) दुपारी सुरू झालेला पाऊस सोमवारी (दि. 19) सकाळपर्यंत सुरू होता. अतिवृष्टीमुळे शहरातून वाहणारी रामगुळणा आणि पांझण या दोन्ही नद्यांना पूर येऊन त्यांनी रौद्ररूप धारण केल्याने पुराचे पाणी नदीकाठच्या अनेक घरांमध्ये तसेच दुकानात शिरले. पाचही पूल पाण्याखाली गेल्याने गेल्या 30 वर्षांनंतर दोन्ही नद्यांना इतका मोठा पूर आला आहे.

पुरामुळे शिवाजीनगर, ईदगाह, कॉलेजरोड, टकार मोहल्ला या भागांतील सर्व पूल पाण्याखाली गेल्यामुळे या भागाचा शहराशी संपर्क तुटला होता. एका आठवड्यात सलग दुसर्‍यांदा नद्यांना पूर येऊन त्यांचे पाणी घरामध्ये शिरल्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. खबरदरीचा उपाय म्हणून पालिका प्रशासनातर्फे शेकडो लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले, तर पूरग्रस्तांसाठी गुरुद्वारात राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.

रामगुळणा नदी
रामगुळणा नदीला आलेला पूर

गेल्या काही दिवसांपासून शहर परिसरात रोजच पाऊस पडत होता. रविवारी दुपारनंतर पावसाला सुरुवात होऊन हलक्या सरी बरसल्या. त्यानंतर पावसाचा जोर वाढला आणि मुसळधार पावसाने अक्षरश: झोडपून काढले. पावसाचा जोर इतका होता की, शहरातून वाहणार्‍या रामगुळणा आणि पांझण या दोन्ही नद्या दुथडी भरून वाहू लागल्या. नेहमीप्रमाणे पुराचे पाणी सर्वांत प्रथम गुरुद्वाराच्या मागे असलेल्या नदीकाठच्या घरात पाणी शिरले. अचानक आलेल्या पुरामुळे सर्वांचीच तारांबळ उडाली होती. तिकडे या भागातील तीन, आययूडीपी भागातील एक आणि बुरकूलवाडी भागातील एक असे पाच पूल पाण्याखाली गेले होते. पावसाचा सर्वांत जास्त फटका विवेकानंद नगर, आययूडीपी, गुरुद्वारा परिसर, गवळीवाडा, ईदगाह आणि टकार मोहल्ला या भागांना बसला. दोन्ही नद्यांना मोठ्या प्रमाणात पुरामुळे पालिका प्रशासन सतर्क झाले आहे.

मुख्याधिकारी डॉ. सचिन कुमार पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी, कर्मचार्‍यांनी नदीकाठच्या लोकांना सुरक्षितस्थळी हलविले. ड्रेनेजची व्यवस्था चांगली नसल्याने सर्वच रस्त्यांवर गुडघ्यापर्यंत पाणी साचून रस्ते जलमय झाले, तर सखल भागातही पाणी साचले. मोठे पूर आले, तरी सुदैवाने जीवितहानी अथवा कोणीही जखमी झाले नाही.

हेही वाचा :

Back to top button