नगर : सेनेच्या नगरसेवकांवर शिंदेंचा गळ; दहा जण प्रवेशासाठी वेळ मागत असल्याचा दावा | पुढारी

नगर : सेनेच्या नगरसेवकांवर शिंदेंचा गळ; दहा जण प्रवेशासाठी वेळ मागत असल्याचा दावा

नगर; पुढारी वृत्तसेवा: महापौर रोहिणी शेंडगे आणि माजी महापौर सुरेखा कदम यांना महापौर करण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महत्त्वाचा वाटा आहे. सध्या शिंदेसेनेकडे पाच नगरसेवक असून, अजून आठ ते दहा नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत. मात्र, ते प्रवेशासाठी वेळ मागत आहेत, असा दावा मुख्यमंत्री शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे यांनी केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या पदाधिकार्‍यांनी आज विविध विषयावर शासकीय विश्रामगृहावर पत्रकार परिषद घेतली. त्यात ते बोलत होते. यावेळी खासदार सदाशिव लोखंडे, शिंदे सेनेचे जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, संपर्कप्रमुख सचिन जाधव, शहरप्रमुख दिलीप सातपुते आदी उपस्थित होते.

शिंदे म्हणाले, आमच्या गटामध्ये नगरसेवक अनिल शिंदे, सुभाष लोंढे, संग्राम शेळके, अक्षय उणवणे, सचिन जाधव हे विद्यमान नगरसेवक असून, काही माजी नगरसेवकही आपल्याबरोबर आहेत. शहरासह जिल्ह्यात पक्ष बांधणीचे काम सुरू आहे. त्याचबरोबर शहराचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील आहोत.

अमृत योजनाच्या निधीसाठी प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यानी दिल्या आहेत. तसेच भुयारी गटार योजनेसाठीही मुख्यमंत्र्यांकडे निधीची मागणी केली आहे. महापालिकेकडून ताबडतोब प्रस्ताव पाठविण्यासंदर्भात आयुक्तांशी चर्चा झाली आहे. आगामी काळात मुख्यमंत्री शिंदे शिवसेना व भाजप अशी एकत्रित युती जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका लढणार आहेत.

मनपा भिंगारला पाणी देणार
अमृत योजना आणि फेटू योजना पूर्ण क्षमतेने कार्यन्वित झाल्यानंतर नगर शहराला वाढीव पाणी मिळणार आहे. त्यातून भिंगारला पाणी देण्याचा प्रस्ताव आहे. तसा प्रस्ताव लवकरच मुख्यमंत्र्यांकडे मनपा प्रशासन सादर करणार आहे. मुख्यमंत्र्यांनी भिंगारला महापालिकेच्या पाणी योजनेतून पाणी दिण्याच्या योजनेला मंजुरी देऊ, असे आश्वासित केले आहे, असेही शिंदे म्हणाले.

Back to top button