धुळे : मुसळधारमुळे जनजीवन विस्कळीत; गावांचा संपर्क तुटला | पुढारी

धुळे : मुसळधारमुळे जनजीवन विस्कळीत; गावांचा संपर्क तुटला

धुळे : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यात रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून ग्रामीण भागातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. पावसाचा प्रकोप पाहता प्रशासनाने धुळे महानगरपालिका हद्दीतील शाळा सोमवार, दि.19 बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून आपत्ती व्यवस्थापनाचे पथक मदतीसाठी कार्यरत झाले आहे. नागरिकांनी नदी नाल्याच्या पुरापासून लांब राहावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. धुळे शहरात नाल्यांचा मूळ प्रवाह अतिक्रमणांमुळे बंद झाल्यामुळे हा प्रकोप झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

धुळे जिल्ह्यात रविवार, दि. 18 सायंकाळ पासूनच जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. रात्रभर मुसळधारमुळे जनजीवन कमालीचे विस्कळीत झाले आहे. नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आल्यामुळे ग्रामीण भागातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. या गावांना मदतीसाठी आपत्ती व्यवस्थापन पथक कार्यरत करण्यात आले आहे. धुळे शहरातून जाणाऱ्या सर्वच नाल्यांना मोठ्या प्रमाणे पूर आल्यामुळे धुळे शहरालगतच्या वसाहती जलमय झाले आहे. धुळे शहरातून वाहणाऱ्या नाल्यांच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर वसाहती उभ्या राहिल्या असून वसाहती तयार करणाऱ्या बिल्डर यांनी नाल्याचा मूळ प्रवाह प्रभावित केला आहे. त्यामुळेच नाल्यांमधून पाणी वाहून जाण्यासाठी मोठा अडथळा निर्माण झाला आहे. परिणामी हे पाणी आता वसाहतींमध्ये शिरले असून पुरामुळे मोठा प्रकोप सहन करावा लागतो आहे ,असा आरोप नागरिकांमधून होतो आहे.

येथील भागात शिरले पावसाचे पाणी :

शहरातून जाणाऱ्या सुशी नाल्याच्या पुरामुळे गौसिया नगर आणि विटा भट्टी परिसरातील वसाहती पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत. यात किमान शंभर ते दीडशे घरे प्रभावित झाली आहेत. वाडी भोकर परिसराकडून येणाऱ्या नाल्याच्या पुराचे पाणी वसाहतींमध्ये शिरले आहे. त्यामुळे या भागांमधील नागरिकांना उंच भागात स्थलांतरित करण्यात आले असून या ठिकाणी पोलीस पथक बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहे. धुळे शहरातील वाडी भोकर रोड ते गोंदूर रोड या भागाकडे जाणारा सर्व रस्ते नाल्याच्या पुराखाली गेल्यामुळे देवपूर आणि उर्वरित धुळे शहराचा संपर्क तुटला आहे. परिणामी रहदारी मोठ्या पुलावरून वळवण्यात आली आहे. धुळे शहरालगत असणाऱ्या चित्तोड गावात मधून येणाऱ्या नाल्याला मोठा पूर आला असून नाल्या काठच्या 50 घरांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे.

धुळे : नाल्यांच्या पुरामुळे गौसियानगर भागात पाणी शिरल्याने नागरिकांना पाण्यात उतरून कसरत करावी लागत आहे.

गावांचा संपर्क तुटल्याने अशाप्रकारे मार्गे वळविली :

नाल्याच्या पुरामुळे नागपूर सुरत वळण रस्त्यावरील रहदारी बंद झाली असून ही रहदारी धुळे शहरातील शिवतीर्थ मार्गे वळवण्यात आली आहे. शहरातील साक्री रोड आणि वलवाडी भागातील नाल्यांचे पाणी देखील वसाहतींमध्ये आल्याने अनेक वसाहती जलमय झाल्या आहेत. धुळे तालुक्यातील बोरकुंड येथील नदीला पूर आल्यामुळे या गावातील पूल रस्त्याखाली गेला आहे. परिणामी शिरूड चौफुली ते आर्वी हा महामार्ग प्रभावित झाला आहे. तर धुळे तालुक्यातील आंबोडे गावाच्या नदीला देखील पूर आल्यामुळे या गावाचा शहराशी संपर्क तुटला आहे. धुळे शहरालगत मोराणे शिवारात असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयाजवळील नाल्याला पूर आल्यामुळे वैद्यकीय महाविद्यालयाचा तसेच रुग्णालयाचा देखील शहराशी संपर्क तुटला आहे. परिणामी या महाविद्यालयात ऑक्सिजन तसेच औषधोपचाराचा पुरवठा करणे आणि रुग्णाची वाहतुक करण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे. यासाठी राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक कार्यरत करण्यात आले आहे.

धुळे : पुरपरिस्थिती निर्माण झाल्याने शंभर ते दीडशे घरे प्रभावित झाली आहेत. (सर्व छायाचित्रे : यशवंत हरणे)

आपत्ती व्यवस्थापन सरसावले :

पूर परिस्थितीमुळे पहाटेपासूनच जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी संबंधित विभागाला तातडीने सूचना देऊन खबरदारीचे सर्व उपाय योजना करणे सुरू केले आहे. तसेच आमदार डॉक्टर फारुख शहा, आयुक्त देविदास टेकाळे ,सहाय्यक आयुक्त संगीता नांदुरकर ,महापालिकेचे सचिव मनोज वाघ तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागाचे जितेंद्र सोनवणे, नगरसेवक अमिन पटेल आणि अनेक लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या वसाहतींमध्ये मदत कार्य सुरू केले आहे. महानगरपालिकेचे आपत्ती व्यवस्थापनाचे पथक देखील नदी आणि नाल्याच्या काठच्या वसाहती मधील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी कार्यरत झाले आहे. दरम्यान आज देखील जोरदार पावसाचा अंदाज लक्षात घेऊन नागरिकांनी पुराच्या पाण्यापासून लांब राहावे तसेच उंच भागात तातडीने स्थलांतरित होण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केलेले आहे.

पाण्यातून मार्ग काढतांना नागरिक

तालुक्यातील चितोड गावातील नाल्याच्या पुरामुळे सुमारे 50 घरांची पडझड झाली आहे. तर रविवार, दि. 18 रात्री चारच्या सुमारास पुराचे पाणी अचानक वसाहतीमध्ये शिरल्यामुळे नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी धाव घेतली मात्र या घरातील संसार उपयोगी साहित्य तसेच अन्नधान्य देखील वाहून गेल्याने नागरिक हवालदिल झाले आहेत.

हेही वाचा:

Back to top button