World Wrestling Championships | बजरंग पुनियाने इतिहास रचला, जागतिक कुस्ती स्पर्धेत ४ पदके जिंकणारा पहिला भारतीय | पुढारी

World Wrestling Championships | बजरंग पुनियाने इतिहास रचला, जागतिक कुस्ती स्पर्धेत ४ पदके जिंकणारा पहिला भारतीय

बेलग्रेड (सर्बिया) : भारताचा कुस्तीपटू बजरंग पुनिया (Bajrang Punia) याने रविवारी वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिपमध्ये (World Wrestling Championships) कांस्यपदक जिंकले. यामुळे वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत चार पदके जिंकणारा तो एकमेव भारतीय कुस्तीपटू ठरला आहे. गेल्या वर्षीच्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या बजरंगने वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिपच्या कांस्यपदकाच्या लढतीत प्यूर्टो रिकोच्या सेबेस्टियन सी रिवेरा याच्यावर ११-९ गुणांनी विजय मिळवला.

या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत अमेरिकेच्या जॉन मायकेल डायकोमिहलिस कडून बजरंगला पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर बजरंग रेपेचेज फेरीद्वारे कांस्यपदकाच्या लढतीसाठी पात्र ठरला होता. जेथे त्याने आर्मेनियाच्या वाझगेन टेवान्यानचा ७-६ गुणांनी पराभव केला.

बजरंगचे हे जागतिक स्पर्धेतील तिसरे कांस्यपदक आहे. त्याने यापूर्वी २०१३ मध्ये कांस्य, २०१८ मध्ये रौप्य आणि २०१९ मध्ये कांस्यपदक जिंकले होते. भारताने सध्या सुरू असलेल्या जागतिक चॅम्पियनशिपसाठी ३० सदस्यीय संघ उतरवला होता. पण या स्पर्धेत भारताला केवळ दोन पदके मिळाली आहेत.

टोकियो ऑलिम्पिकमधील रौप्यपदक विजेता रवी कुमार दहिया लवकरच या स्पर्धेतून बाहेर गेला. बजरंग व्यतिरिक्त भारताची महिला कुस्तीपटू विनेश फोगटने महिलांच्या ५३ किलो वजनी गटात दुसरे जागतिक चॅम्पियनशिप कांस्यपदक जिंकले. विनेशने स्वीडनच्या एम्मा माल्मग्रेनचा ८-० असा पराभव करत कांस्यपदकावर आपले नाव कोरले.

ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता बजरंग पुनिया (६५ किलो) याला शनिवारी येथे वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिपच्या (World Wrestling Championships) उपांत्यपूर्व फेरीत पराभव पत्करावा लागला. बजरंग पुनियाला ६५ किलो वजनी गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत तांत्रिक श्रेष्ठतेच्या (१०-०) आधारावर अमेरिकेच्या २३ वर्षीय डायकोमिहलिसकडून पराभव पत्करावा लागला.

मात्र, दोन वेळच्या कॅडेट विश्वविजेत्या डायकोमिहलिसने अंतिम फेरी गाठली. तर बजरंगला कांस्यपदकासाठी खेळावे लागले. दोन वेळा कॉमनवेल्थ गेम्समध्ये चॅम्पियन ठरलेल्या बजरंग पुनियाने या संधीचा पुरेपूर फायदा घेतला आणि कांस्यपदक जिंकले.

राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा बजरंग पुनिया (Bajrang Punia) हा पहिला भारतीय कुस्तीपटू आहे. २०१८ मध्ये त्याने गोल्ड कोस्ट राष्ट्रकुल स्पर्धेत आणि २०१८ मधील जकार्ता आशियाई गेम्समध्ये सुवर्णपदके जिंकले आहे. बजरंगने २०२२ च्या राष्ट्रकुल स्पर्धेतही सुवर्णपदक जिंकले आहे. बजरंगने २०१४ इंचियोन आशियाई स्पर्धेत ६१ किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकले होते.

हे ही वाचा :

Back to top button