कुपोषण रोखण्यासाठी अ‍ॅप तयार करणार : आदिवासी विकासमंत्री डॉ. गावित यांची घोषणा | पुढारी

कुपोषण रोखण्यासाठी अ‍ॅप तयार करणार : आदिवासी विकासमंत्री डॉ. गावित यांची घोषणा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आदिवासी क्षेत्रातील कुपोषण निर्मूलनासह स्थलांतर व रोजगार निर्मितीसाठी सहा महिन्यांमध्ये अ‍ॅप तयार करणार असल्याची घोषणा आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केली. कुपोषण व नवसंजीवनी योजनांमध्ये नाशिकचे कामकाज चांगले असून, त्यात अधिक सुधारणा करण्यास वाव असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी (दि.15) आदिवासी विकास विभागांतर्गत नवसंजीवनी योजनांचा ना. गावित यांनी आढावा घेतला. या बैठकीनंतर ना. गावित यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, आदिवासी विभागातील सर्वांगीण विकासासाठी गठीत केलेल्या जिल्हास्तरीय समित्यांचे कामकाज समाधानकारक नाही. त्यामुळे या क्षेत्रातील कुपोषणासह रोजगार, स्थलांतर तसेच मूलभूत सुविधांवर लक्ष देण्याची आवश्यकता आहे. कुपोषण रोखण्यासाठी अंगणवाडी स्तरावर अ‍ॅप तयार करण्यात येणार आहे. अ‍ॅपमध्ये सेविकांना अंगणवाडीत आल्यापासून ते कुलूप लावून घरी जाईपर्यंत विविध योजनांचा सेल्फी वेळोवेळी काढून पाठविणे बंधनकारक असेल. आदिवासींचे स्थलांतर रोखताना गावातच त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी अ‍ॅप तयार करणार असल्याची माहिती ना. गावितांनी दिली.

नवसंजीवनीअंतर्गत शासनाच्या विविध विभागांतील योजनांचा लाभ शेवटच्या आदिवासी बांधवाला मिळावा यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखण्याच्या सूचना विभागांना देण्यात आल्या आहेत. आजही बहुतांश आदिवासींकडे जातीचा दाखला, रेशन, आधार, जॉब व आरोग्यकार्ड नसल्याने शासकीय योजनांपासून त्यांना वंचित राहावे लागते. ही समस्या सोडविण्यासाठी प्रकल्प कार्यालयांनी कॅम्प घेत दोन महिन्यांत संबंधितांना कार्ड तसेच दाखले उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच आदिवासी भागातील आरोग्य केंद्र इमारती, पदे भरती, अंगणवाडी यांची सविस्तर माहिती घ्यावी. तसेच जेथे कमतरता असेल त्याबाबतचा अहवाल तातडीने शासनाकडे सादर करण्याच्या सूचनाही ना. गावित यांनी यंत्रणांना दिल्या आहेत.

पंधरवड्यात पालकमंत्री नियुक्ती
शासनाने जिल्हा नियोजन विभागांतर्गत सर्व उपयोजनांच्या निधी खर्चावर निर्बंध लादल्याबाबत ना. गावित यांचे लक्ष वेधण्यात आले. त्यावर येत्या पंधरवड्यात पालकमंत्र्यांची नियुक्ती होणार असल्याने निधी खर्चाचा विषय मार्गी लागेल. तोपर्यंत आदिवासी भागातील रस्ते, पाणी, वीज, आरोग्य अशा मूलभूत सुविधांचे प्रस्ताव तयार ठेवण्याच्या सूचना विभागाला केल्या आहेत. जेणेकरून पालकमंत्र्यांच्या नेमणुकीनंतर या कामांना चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

धर्मांतराच्या घटना रोखणार
पालघरमध्ये आदिवासी महिलांचे बळजबरीने धर्मांतर केले जात असल्याबाबत गावित यांना विचारले असता त्यांनी अशा घटना रोखण्यासाठी उपयायोजना राबविण्यात येतील. तसेच इगतपुरीची घटना दुर्देैवी आहे. गेल्या चार वर्षांपासून गुराख्याच्या मुलांना अन्य जिल्ह्यात पाठविले जात असल्याचे उघड झाले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याची माहिती ना. गावित यांनी दिली.

हेही वाचा :

Back to top button