गुडघ्यांवर ताण येऊ नये यासाठी ‘ही’ घ्या काळजी | पुढारी

गुडघ्यांवर ताण येऊ नये यासाठी 'ही' घ्या काळजी

चालणं, धावणं, पळणं आणि कितीतरी गोष्टी आपल्या दोन पायांच्या भरवशावरच आपण करत असतो. काही काळानंतर पाय दुखायला लागतात तेव्हा चालताना, वाकताना किंवा उठताना पायाच्या गुडघ्यातून कडकड असा आवाज यायला लागतो. इतकेच काय फार काळ एकाच जागी बसल्यावर उठताना तर ब्रह्मांड आठवते. त्यामुळे गुडघ्यांची काळजी घेणे अतिशय गरजेचे आहे.

लहान मूल जेव्हा पायावर उभे राहते तेव्हा त्याला आणि कुटुंबाला किती आनंद होतो. एकदा का बाळाला पाय फुटले की ते आयुष्यभर पळत असते. आपल्या आयुष्यातील सर्वाधिक काळ दोन पायांवर उभे राहत असतो. त्यामुळे गुडघ्यांची काळजी घ्यायलाच हवी.

हिल्स नको : हाय हिल्स घातल्याने उंची वाढते ती तात्पुरती पण त्याचा दुष्परिणाम पायांवर होत असतो. त्यामुळे आपल्या चालण्याची ढब तर बदलतेच, पण आपल्या गुडघ्यांवर त्याचा सर्वाधिक परिणाम होतो. त्यामुळे हाय हिल्सची आवड असली तरीही ते विशेष समारंभात घाला आणि अधूनमधून काढून ठेवून पायांना आराम द्या. त्यामुळे गुडघ्याचे आरोग्य चांगले राहण्यास मदत मिळेल.

कठीण पृष्ठभागावर पळू किंवा धावू नका : व्यायाम म्हणून पळणे किंवा जॉगिंग नक्कीच चांगला व्यायाम आहे, पण कठीण पृष्ठभागावर जसे सिमेंटचा रस्ता वगैरे यावर पळलात तर गुडघ्यावर अनाठायी ताण येईल. जॉगिंग आणि धावणे यासाठी मातीचा किंवा वाळूचा पृष्ठभाग सर्वोत्तम असतो. त्यामुळे गुडघ्यांवर ताण न येताना त्याचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. आपल्या व्यायामाला सुरुवात करण्यापूर्वी गुडघ्यांवर ऊबदार कापड गुंडाळावे. वीस ते तीस मिनिटे आधी हे कापड गुंडाळावे. त्यामुळे व्यायाम करताना गुडघ्यावरचा ताण कमी होतो. व्यायामाला सुरुवात करण्यापूर्वी सांधे मोकळे करण्यासाठी स्ट्रेचिंग करायला सुरुवात करा. याखेरीज व्यायामातील प्रत्येक प्रकारानंतर गुडघ्यांना आराम मिळायला हवा.

हाडांच्या बळकटीसाठी कॅल्शियमचे सेवन आवश्यक आहे. त्यामुळे हाडे कुरकुरायला लागण्याआधीच काळजी घ्या. नैसर्गिक स्वरूपातील आहार खाण्यावर अधिक भर द्या. त्यामुळे कॅल्शियमचे प्रमाण वाढेल. जसजसे वय वाढते तसे आहारात कॅल्शियमचे प्रमाण अधिक असायला हवे. त्यामुळे हाडांची झीज कमी होते. आपल्या धावत्या जीवनासाठी आपल्या पायांची ताकद योग्य राहायला हवी. आयुष्यात खंड पडू नये असे वाटत असेल तर वेळीच गुडघ्यांची काळजी घ्या.

  • डॉ. भारत लुणावत

Back to top button