नाशिक : रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच महिलेची प्रसूती, अर्भक दगावले | पुढारी

नाशिक : रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच महिलेची प्रसूती, अर्भक दगावले

सटाणा : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा
येथील ग्रामीण रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या शेमळी येथील आदिवासी महिलेस रुग्णालय कर्मचार्‍यांनी दाखल करून न घेतल्याने ती प्रवेशद्वारातच प्रसूती झाली आणि दुर्दैवाने अर्भक दगावले. यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांसमवेत रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराला मंगळवारी (दि.13) सायंकाळी टाळे ठोकले होते. या पार्श्वभूमीवर आरोग्य उपसंचालक रघुनाथ भोये, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात व डॉ. अनंत पवार यांच्या समितीने बुधवारी (दि.14) दुपारी या रुग्णालयाला भेट दिली. येत्या महिन्याभरात रुग्णालयातील सर्व रिक्त पदे भरण्याचे आश्वासन समितीने सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्या बैठकीत दिले.

शेमळी येथील मनीषा समाधान सोनवणे ही नऊ महिन्यांची गर्भवती बाळंतपणासाठी मंगळवारी (दि.13) सायंकाळी ग्रामीण रुग्णालयात दाखल होण्यासाठी आली होती. परंतु, वैद्यकीय अधिकारी नसल्याचे कारण सांगून आरोग्य कर्मचार्‍यांनी मालेगाव किंवा कळवण रुग्णालयात जाण्यास सांगितले. असह्य वेदना होत असून, प्रकृती बिघडल्याची विनंती महिला तसेच नातेवाइकांकडून करण्यात आली. परंतु, त्यास कुणीही दाद दिली नाही, असा आरोप नातेवाइकांनी केला आहे. याचवेळी संबंधित महिला ही रुग्णालयाच्या प्रवेशद्वारातच प्रसूत झाली आणि काही वेळातच तिचे नवजात अर्भक दगावले. यामुळे नातेवाईक व ग्रामस्थ संतप्त झाले. सरपंच संदीप बधान, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संजय चव्हाण, शहर कार्याध्यक्ष मनोज सोनवणे, निखिल खैरनार, अनिल पाकळे आदींसह कार्यकर्त्यांनी रुग्णालयाच्या प्रवेशद्वाराला टाळे ठोकले. जिल्हा शल्यचिकित्सक येत नाही तोपर्यंत टाळे न उघडण्याची भूमिका यावेळी घेण्यात आली तसेच नवजात अर्भकाच्या मृत्यू प्रकरणी कारवाई करण्याचीही जोरदार मागणी करण्यात आली. यावेळी माजी आमदार चव्हाण यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांशी दूरध्वनीद्वारे चर्चा केली. त्यांनी रुग्णालयाला भेट देण्याचे आश्वासन दिले आणि टाळे उघडण्यात आले.

महिनाभरात रिक्त पदे भरणार
बुधवारी (दि14) दुपारी आरोग्य उपसंचालक रघुनाथ भोये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. थोरात व डॉ. अनंत पवार यांच्या समितीने ग्रामीण रुग्णालयास भेट दिली. प्रारंभी त्यांनी याप्रकरणी रुग्णालय कर्मचार्‍यांशी चर्चा व चौकशी केली. यानंतर सर्वपक्षीय पदाधिकारी व ग्रामस्थांसमवेत बैठक घेण्यात आली. डॉ. थोरात यांनी येत्या महिन्याभरात ग्रामीण रुग्णालयातील सर्व रिक्त पदे भरून सर्व सेवा सुविधा सुरळीत केली जाईल, असे आश्वासित केले. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष विजय वाघ, रत्नाकर सोनवणे, उषा भामरे, रेखा शिंदे, डॉ. व्ही. के. येवलकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख लालचंद सोनवणे, माजी शहरप्रमुख शरद शेवाळे, भाजपाचे माजी नगरसेवक साहेबराव सोनवणे, डॉ. विद्या सोनवणे, काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष किशोर कदम, आरपीआयचे किशोर सोनवणे, श्रीपाद कायस्थ, निखिल खैरनार, ओम सोनवणे आदींसह सर्वपक्षीय पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button